गोंदिया: तालुक्यातील बिरसी विमानतळावर नाईट लँडिंगची अडचण दूर झाली आहे. त्यानंतर आता या विमानतळा वरून प्रवासी विमान सेवा सुरू करण्यास विमान कंपन्या उत्सुक आहेत. या अंतर्गत आता स्टार एअर कंपनीने बिरसी विमानतळावरून गोंदिया ते इंदूर प्रवासी विमानसेवा करण्याचे निश्चित केले आहे. या कंपनी चे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बिरसी येथे येऊन विमान प्रवास सेवा तसेच प्रवाशांकरिता आवश्यक असलेल्या सोयीसुविधांची पाहणी केली. यात त्यांचे समाधान झाले असल्यामुळे आलेल्या अधिकाऱ्यांनी याच एप्रिल २०२५ महिन्यात गोंदिया-इंदूर विमान सेवेला प्रारंभ होणार असल्याचे सांगितले.

गोंदिया जिल्ह्यातील बिरसी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ आहे. या विमानतळावरून गेल्या वर्षी पासून इंडिगो कंपनीने गोंदिया- हैदराबाद तिरुपती ही प्रवासी विमानसेवा सुरू केली आहे . त्याला प्रवाशांचा अति उत्तम असा प्रतिसाद मिळत आहे. गेल्या २०२४ या वर्षभरात बिरसी विमानतळावरून ४० हजारांवर प्रवाशांनी प्रवास केला आहे. गोंदिया-मुंबई, गोंदिया-पुणे व गोंदिया-छत्रपती संभाजीनगर या मार्गावरसुद्धा विमानसेवा सुरू करण्याचे नियोजित होते; पण पूर्वी या बिरसी विमानतळावर नाईट लैंडिंगची अडचण होती. ही अडचण आता खा. प्रफुल्ल पटेल आणि बिरसी विमानतळ प्राधिकरण यांच्या प्रयत्नांमुळे दूर झाली आहे. त्यामुळे गोंदिया-मुंबई आणि गोंदिया-इंदूर दरम्यान लवकरच प्रवासी विमानसेवा सुरू करण्याचे संकेत दिले जात होते. बिरसी विमानतळावरून गोंदिया-इंदूर प्रवासी विमानसेवा करण्याचे कंत्राट स्टार एअर या विमान कंपनी ने घेतले आहे. या कंपनीचे तीन वरिष्ठ अधिकारी बिरसी विमानतळाची पाहणी करून एक दिवसांपूर्वीच गेले. त्यांनी सुद्धा लवकरच प्रवासी विमानसेवा सुरू होण्याचे संकेत दिले आहेत . त्यामुळे आता गोंदिया जिल्ह्यासह लगतच्या मध्यप्रदेश आणि छत्तीसगड राज्य येथील प्रवाशांना गोंदिया हून विमानाने इंदूर ला जाणे शक्य होणार आहे.

८८ सीटचे असणार विमान

स्टार एअर कंपनीच्या ई १७० या नावाचे ८८ सीट चे विमान असणार आहे . या एप्रिल महिन्यातच गोंदिया-इंदूर विमान सेवेला लवकरच सुरुवात होणार आहे. सकाळी ११:३० वाजता इंदूर हून गोंदिया ला विमान पोहोचेल त्यानंतर पुन्हा तेच विमान दुपारी १२:३० वाजता गोंदिया हून- इंदूर साठी उड्डाण भरेल. नागरी विमान वाहतूक महासंचालनालय ने हवामान क्रियाकलाप किंवा हवामान अंदाजांवर आधारित कोणतीही कृती किंवा मोहीम तपासणीची परवानगी बिरसी विमानतळाला दिल्याने यातील मोठी अडचण सुद्धा दूर झाली आहे.

स्टार एअर विमान कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बिरसी विमानतळाचे नुकतेच निरीक्षण केले. त्यांनी गोंदिया-इंदूर मार्गावर विमानसेवा लवकरच सुरू करण्याचे संकेत दिले आहेत.

गिरीशचंद्र वर्मा, संचालक, बिरसी विमानतळ प्राधिकरण