लोकसत्ता टीम
अमरावती : राज्यातील ५४ शहरांमध्ये बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे मोठ्या प्रमाणावर बांगलादेशींना जन्म दाखले देण्यात आले असून या सर्व प्रकरणांची चौकशी करून संबंधितांच्या विरोधात कठोर कारवाई करावी, अशी मागणी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे, अशी माहिती भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी गुरूवारी अंजनगाव सुर्जी येथे प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली.
किरीट सोमय्या म्हणाले, गेल्या सहा महिन्यांत महाराष्ट्रात २.२३ लाख बांगलादेशी आणि रोहिंग्यांनी जन्म दाखल्यांसाठी अर्ज केले आहेत. ९७ टक्के अर्ज हे बांगलादेशी रोहिंग्या मुस्लिमांचे असून त्यांनी खोटे कागदपत्रे सादर करून हे दाखले मिळवले आहेत. ५४ शहरांमध्ये अशी प्रकरणे निदर्शनास आली आहे. हे एक मोठे षडयंत्र आहे. विदर्भातील अमरावती, अकोला आणि यवतमाळ जिल्ह्यातही बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे जन्म दाखले मिळविण्यात आले आहेत. अंजनगाव सुर्जी येथे जन्म दाखल्यांसाठी १४८४ अर्ज आले होते. त्यापैकी ५८५ लोकांना दाखले देण्यात आले. ९०० जणांची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आपण स्वत: अशा बनावट शंभर प्रकरणांचे पुरावे अंजनगाव पोलिसांकडे सादर केले असून त्यांनी या प्रकरणी संबंधितांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा. या प्रकरणांमध्ये तहसील कार्यालयातील काही कर्मचारी, दलाल आणि वकिलांचाही सहभाग दिसून आला असून संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे केली आहे, असे सोमय्या म्हणाले.
बांगलादेशींना जन्म दाखले संशयास्पद परिस्थितीत देण्यात आले आहेत, असाही आरोप किरीट सोमय्या यांनी केला. अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणी चौकशी समिती स्थापन केली असली, तरी या समितीने काहीच काम केलेले नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी केवळ वेळकाढू धोरण अवलंबले. किरीट सोमय्या स्वत: शंभर बनावट प्रकरणे शोधून देऊ शकतो. या समितीला एकही बनावट प्रकरण शोधता आलेले नाही, हे जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि संबंधित अधिकाऱ्यांचे अपयश आहे. त्यांनाही यासंदर्भात जाब विचारला पाहिजे, असे सोमय्या म्हणाले.
बांगलादेशी रोहिंग्यांना बनावट जन्म प्रमाणपत्र दिल्याबद्दल नुकतेच मालेगावचे तहसीलदार आणि नायब तहसीलदार यांना निलंबित करण्यात आले आहे. मालेगावप्रमाणेच इतर ठिकाणीही आता कारवाई होणार असून काही अधिकाऱ्यांचे निलंबन होणार असल्याचे सुतोवाच सोमय्या यांनी केले. एका बाजूला अधिकाऱ्यांवर कारवाई दुसऱ्या बाजूला या बांगलादेशींना परत पाठवण्याचे काम केले जाणार आहे. तसेच यापुढे जन्म प्रमाणपत्र देत असताना व्यवस्थित लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचेही ते म्हणाले.