नागपूर : कंत्राटी भरतीवरून महाराष्ट्रातील लाखो बेरोजगार तरुणांची दिशाभूल करण्याचे काम उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केले. त्यांचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंदद्रेशखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात व्हेरायटी चौकात निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी महाविकास आघाडीतील नेत्यांच्या विरोधात घोषणा देत त्यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला.
कंत्राटी भरतीचे महापाप करणारे उद्धव ठाकरे, शरद पवार व नाना पटोले व मविआने महाराष्ट्राची नाक घासून माफी मागावी अशी मागणी करत चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कंत्राटी भरतीच्या निर्णयावर स्वाक्षरी केली आहे. आता तीच कंत्राटी पद्धत देवेंद्र फडणवीस यांनी आणल्याचे सांगून सरकारला दोष देत आघाडीचे नेते नौंटकी करत आहेत. कंत्राटी भरती हे काँग्रेसचे केलेले पाप आहे. महाविकास आघाडीने राज्यातील जनतेची दिशाभूल केली आहे, त्यामुळे त्यांच्या विरोधात राज्यात युवकांचे मेळावे महाविकास आघाडीचे हे पाप समोर आणणार असल्याचे बावनकुळे म्हणाले.
हेही वाचा – रेशनचा तांदूळ जातो तरी कुठे? तहसीलदारांनी छापा टाकला अन्…
हेही वाचा – सोन्याच्या दरात मोठी उसळी, आजचे दर पहा…
यावेळी शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांचे निषेध करणारे फलक लावत त्यांचा निषेध करण्यात आला. यावेळी शहर अध्यक्ष बंटी कुकडे, जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे, अर्चना डेहनकर, प्रदेश उपाध्यक्ष संजय भेंडे, धर्मपाल मेश्राम, मिलिंद माने आदी भाजपाचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.