बाळापूर विधानसभा मतदारसंघातील ६९ गावे पाणीपुरवठा योजना केंद्र सरकारने खा. संजय धोत्रे यांच्या मागणीवरून मंजूर केली. ती योजना अकोट मतदारसंघातील सर्वपक्षीय नेत्यांच्या मागणीवरून स्थगित झाली. त्यामध्ये ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांचादेखील समावेश आहे. आमदार नितीन देशमुखांनी विनाकारण राजकारण करून जनतेची दिशाभूल करू नये. बाळापुरात श्रेय घेण्यासाठी आ. देशमुख आंदोलनाचे नाटक करीत आहेत, असा आरोप भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य तेजराव थोरात यांनी केला.
हेही वाचा >>>नागपूर: संपात सहभागी होणाऱ्या शिक्षकांना नोकरीवरून काढण्याच्या धमक्या, शिक्षक संघटना आक्रमक
६९ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेला शिंदे-फडणवीस सरकारकडून स्थगिती देण्यात आल्याचा मुद्दा पेटला आहे. याप्रकरणी आ. देशमुख यांनी भाजपवर आरोप करून आंदोलन करण्याचा इशारा दिल्यावर भाजपकडून त्याला प्रत्युत्तर देण्यात आले. बाळापूर विधानसभा मतदारसंघातील पूर्णा व मोर्णा नदीच्या काठावरील परिसर खारपाणपट्ट्यात येतो. या भागात पिण्यासाठी कुठेही गोड पाण्याचे स्त्रोत उपलब्ध नाही. त्यामुळे या भागातील शेती देखील केवळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते. शेतकऱ्यांना शेतीला मुबलक पाणी उपलब्ध होण्यासाठी खा. धोत्रे यांनी पुढाकार घेऊन नेरधामणा, कवठा सिंचन प्रकल्प व कारंजा रमजानपूर साठवण तलावासाठी शासनाकडून निधी मंजूर करून घेतला. गावागावात नळाचे पाणी पोहचण्यासाठी केंद्राकडुन जलजीवन मिशन अंतर्गत खारपाणपट्ट्यात येणाऱ्या बाळापूर विधानसभा मतदारसंघातील ६९ गावासाठी पाणीपुरवठा योजना मंजूर केली. या योजनेला लागणारा निधी केंद्र सरकारचा आहे. मात्र, आ. देशमुख आपणच ही योजना मंजूर करून आणल्याचे भासवत आहेत, असे थोरात म्हणाले.
हेही वाचा >>>चंद्रपूर: कोल माफियांची गुंडागर्दी, बंदूक डोक्याला लावून तीन ट्रक कोळसा चोरला
आ. देशमुखांच्या पक्षात काम करणारे अकोट मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांनी आ. भारसाकळे यांच्या नेतृत्वात उपमुख्यमंत्र्यांना भेटून पाणीपुरवठा योजनेला स्थगित देण्याचे काम केले. आ. देशमुख स्वत: त्या पक्षाचे जिल्हाप्रमुख आहेत. एक मतदारसंघात तुमच्या पक्षाची वेगळी भूमिका आणि दुसऱ्या मतदारसंघात वेगळी भूमिका हे राजकारण नाही का? असा सवाल थोरात यांनी करून किमान जनतेच्या पिण्याच्या पाण्यात तरी राजकारण करू नका, असा सल्ला दिला आहे. राजकारण हे विकासाचे असावे, द्वेषाचे नसावे, असे देखील थोरात म्हणाले.