लोकसत्ता टीम

अकोला : देशात लोकशाही व संविधानासाठी भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे धोकादायक आहेत. या लोकसभा निवडणुकीत समतेच्या विचारधारेचे जतन करण्यासह संविधानाचे मूल्य जपण्यासाठी राज्यात संभाजी ब्रिगेड महाविकास आघाडीच्या पाठिशी राहील. त्यांच्या प्रचारात पूर्ण क्षमतेने उतरणार असल्याची माहिती संभाजी ब्रिगेडचे प्रदेश महासचिव सौरभ खेडेकर यांनी आज येथे दिली.

आणखी वाचा-“महाविकास आघाडीत कुठलाच ताळमेळ नाही”, भाजप प्रभारी दिनेश शर्मा यांची टीका; म्हणाले, “त्यांना केवळ दोन किंवा तीन…”

अकोल्यात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली. गेल्या अनेक वर्षापासून राज्यात पुरोगामी चळवळ संभाजी ब्रिगेडने गतिमान केली. २०१६ मध्ये राजकीय पक्षात परिवर्तन झाले. भारतीय जनता पक्षाच्या विचारसरणीच्या विरोधात संभाजी ब्रिगेड आहे. देशात संविधान बदलण्याची भाषा होत आहे. महागाई व बेरोजगारीने संपूर्ण देश होरपळून निघाला. महिलांच्या सुरक्षितेचा प्रश्न निर्माण झाला. देशातील ८० टक्के जनता भाजपच्या राजवटीने त्रासली आहे, असा आरोप खेडेकर यांनी केला. नवे विकासाचे मुद्दे घेऊन संभाजी ब्रिगेड महाविकास आघाडीच्या सोबत निवडणूक प्रचारात उतरत आहेत. अकोल्यासह चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती आदी लोकसभा मतदारसंघात संभाजी ब्रिगेड महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचारात उतरल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात महाविकास आघाडीसाठी पोषक वातावरण असल्याचे त्यांनी नमूद केले.

Story img Loader