प्रशांत देशमुख, लोकसत्ता
वर्धा : भाजपचे चाणक्य म्हणून ओळख दिल्या जाणारे देशाचे गृहमंत्री अमित शहा हे टास्क मास्टर म्हणून प्रत्येक पदाधिकारी त्यांचा आदेश शिरसावंज्ञ म्हणून कामास लागतो. निवडणूक विषयक कामाचा आढावा घेण्यासाठी ते अकोला येथे आले होते. त्यावेळी त्यांनी पक्षाच्या निवडणूक कार्यालयाबाबत स्पष्ट सूचना केल्या होत्या. कार्यालय स्वतंत्र असावे. ते कोणत्या आमदार, खासदार किंवा उमेदवाराच्या घरी नसावे. असे असल्यास त्या नेत्यास पसंत न करणारे कार्यकर्ते त्याच्या कार्यालयात जात नाही. निवाससह सर्व सोयीनी युक्त हे निवडणूक कार्यालय असावे म्हणून त्यांनी सूचना केल्या होत्या. या सूचना देशभर पाळल्या गेल्याचे सांगितल्या जाते. पण त्यास अपवाद म्हणून आर्वी कडे बोट दाखविल्या जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इथे पक्षाचे लोकसभा क्षेत्र प्रमुख असलेले सुमित वानखेडे यांनी स्वतंत्र कार्यालय उघडले. त्यास स्थानिक आमदार दादाराव केचे तसेच अन्य पदाधिकाऱ्यांना निमंत्रण देत उमेदवार असलेले खासदार रामदास तडस यांच्या हस्ते उदघाटन केले. मात्र केचे हजर झाले नाही. चारच दिवसांनी आ. केचे यांनी दुसरे कार्यालय थाटले. त्याचे उदघाटन परत तडस यांनी केले. वानखेडे पण हजर झाले. आता आर्वीत भाजपची दोन निवडणूक कार्यालये झालीत. पण कार्यकर्ते मात्र पेचात पडले आहे. कारण वानखेडे व केचे यांच्यात पक्षीय वैर असल्याचे उभा वर्धा भाजप जाणतो. वानखेडे हे आर्वी विधानसभा क्षेत्राचे संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत आले आहेत.

आणखी वाचा-रश्मी बर्वे निवडणुकीपासून दूरच; सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू म्हणून सर्वत्र परिचित वानखेडे हे इथलेच. त्यांनी दोन वर्षांपासून फडणवीस यांच्या सूचनेने आर्वीत काम करणे सूरू केले. त्यांना पक्षीय व मंत्रालयीन वलंय प्राप्त असल्याने त्यांच्या विकास कामं करण्याची गाडी सुसाट धावत सुटली. कोट्यावधी रुपयाचा निधी पावसासारखा पडतच राहला. या हालचाली चाणक्ष म्हटल्या जाणाऱ्या केचे यांच्या नजरेतून सुटल्या नाहीत. मात्र वानखेडे हे त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमात केचे यांना हमखास बोलवायचे. केचे जाणे टाळत. केचे मात्र त्यांना बोलवत नसल्याची बाब उघड चर्चेत यायची. श्रेय घेत असल्याबद्दल केचे हे नव न घेता नाराजी व्यक्त करीत. यामुळे स्थानिक पातळीवर गोंधळ उडे. काम करवून आणण्याचा झपाटा पाहून केचे पेक्षा वानखेडे यांच्याकडे गर्दीचा ओघ वाढू लागला. आता कोणता झेंडा घेऊ हाती, असा प्रश्न परत उभा झाला आहे. कारण दोन निवडणूक कार्यालय झाल्याने प्रचार साहित्य कुठून घ्यायचे, असा प्रश्न कार्यकर्ते मंडळीस पडला आहे. याला दिसले तर तो व त्याला दिसलें तर हा नाराज, अशी स्थिती आहे.

आणखी वाचा-गृहमंत्र्यांच्या गृहशहरात महिला असुरक्षित? भरदुपारी गँगरेपचा प्रयत्न

यावर बोलतांना पक्षाचा एक नेता म्हणाला की आमदारांनी स्वतंत्र कार्यालय उघडले तर काय बिघडते. फार जगावेगळी बाब नाही. दोन्ही स्थळावरून पक्षाचेच काम चालते नं, असा प्रश्न या नेत्याने केला. मात्र एक देश मे दों निशाण नही चलेंगे, नही चलेंगे, अशी कधी काळी झालेली घोषणा आता आठवल्या जात आहे, हे मात्र नक्की. एक बाब अशी की वानखेडे यांच्या कार्यालयच्या दर्शनी भागात केचे यांचा फोटो पक्षाच्या राष्ट्रीय नेत्यांच्या रांगेत आहे. मात्र केचे कार्यालयापुढील फोटोतून वानखेडे गायब झाले आहेत. दुस्वास दाखविणारी ही बाब निष्ठावंतांना विचारात पाडत आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp candidate ramdas tadas has two offices in the city without obeying the order of amit shah pmd 64 mrj