नागपूर: उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याबाबत चर्चा सुरू आहे. त्याबाबत महसूलमंत्री व भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरात एक महत्वाचे विधान केले आहे. राहुल गांधी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत वाईट पद्धतीने बोलत असताना उद्धव ठाकरे त्यांना पाठिंबा देतात तर आदित्य ठाकरे मिठी मारतात, असेही बावनकुळे म्हणाले.

नागपुरात माध्यमांशी बोलताना बावनकुळे म्हणाले, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर तो त्यांचा अधिकार आहे, महाराष्ट्रात कुठल्या पक्षाच्या नेत्यांनी कोणासोबत युती करायची हा त्यांचा अधिकार आहे. त्यांची युती होत असेल तर आम्हाला काही समस्या नाही.

भाजपला पक्ष मजबूत करायचा आहे. त्यांच्या युतीवर मी काही बोलणार नाही. पहलगाममध्ये राष्ट्रावर मोठा आघात झाला आहे. यातील एका तरी कुुटुंबाशी शरद पवार भेटले आहेत का? त्यांना विचारले का? मतांच्या लांगूलचालनासाठी शरद पवारांनी असे करू नये. भारतात असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना केंद्र सरकारने डेडलाईन दिली आहे, त्यांना भारत देश सोडावाच लागेल, जो आश्रय या देशात मिळतो तो या देशात मिळू नये. या देशात राहून पाकिस्तानचा जयजयकार करणे चालणार नाही, जेव्हा पाकिस्तान जिंकतो तेव्हा फटाके फोडतात, अशी ही वृत्ती मोडून काढली पाहिजे, पाकिस्तान जिंकल्यानंतर भारतात पाकिस्तानचे झेंडे फडकवणे हे भारताला मान्य नाही, म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानी लोक चले जाव… ही भूमिका घेतली आणि ती योग्य असल्याचेही बावनकुळे म्हणाले.

महाराष्ट्र विकसित होतपर्यंत फडणवीसच….

काल मला काँग्रेसच्या एका नेत्याने विचारले, की तुम्ही मुख्यमंत्री झाले पाहिजे. त्यावेळी मी म्हटले आमचे सरकार हे उत्तम सरकार आहे. महाराष्ट्राला विकसित करण्याचा संकल्प देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. महाराष्ट्र विकसित होतपर्यंत म्हणजे २०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री राहिले पाहिजे. एकनाथ शिंदे, अजित पवार आणि आम्ही सगळे विकसित महाराष्ट्रासाठी एकत्र आहोत. फडणवीस गतिमान मुख्यमंत्री आहेत, असेही बावनकुळे म्हणाले.

महामंडळ नियुक्तीबाबत महत्वाचे वक्तव्य

सरकारचे १०८ महामंडळ, ७६५ अशासकीय सदस्य आहेत. त्यामुळे आता वेगवेगळ्या महामंडळांवर जिल्हास्तरीय तालुकास्तरीय कमिटी आहेत. साधारणतः महायुतीमध्ये तीन ते पाच हजार कार्यकर्ते विविध पदावर येऊ शकतात. यासाठी महायुतीतील सर्व नेते आणि पदाधिकारी सर्व एकत्र बसून येत्या दोन महिन्यात सर्व शासकीय समित्या महामंडळांवरील नियुक्त्या केंद्रीय भाजपच्या परवानगीने करणार, असेही बावनकुळे यांनी सांगितले.