वाशीम : राज्यात अनेक सरकारे आलीत आणि गेलीत मात्र, महिलांचे प्रश्न आजही कायम आहेत. लाखो रुपये खर्चून मोठ-मोठे रस्ते बांधण्यात आले. परंतु कोणत्याही महामार्गावर महिलांसाठी स्वच्छतागृहेच नाही. यामुळे प्रवासादरम्यान महिलांची मोठी कुचंबणा होते. याचा प्रत्यय सत्ताधारी पक्षातील भाजप महिला प्रेदश अध्यक्षा चित्रा वाघ यांना आला. महिलांची होणारी घुसमट दूर करण्यासाठी रस्त्याच्या कडेला महिलांसाठी स्वच्छतागृहे बांधण्याचा प्रस्ताव सरकारकडे मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा >>> विलंबाने विवाह, बाळ होऊ न देण्याच्या नियोजनामुळे महिलांमध्ये वंधत्वात वाढ; शहरातील स्त्री व प्रसूतीरोग तज्ज्ञांचे निरीक्षण
राज्यातील महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी आणि पक्षसंघटनवाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी वाशीम येथे आयोजित पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. भाजप महिला प्रदेश अध्यक्ष पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर संघटन वाढीसाठी राज्यभरत फिरत आहे. प्रवासादरम्यान कोणत्याही रस्त्याच्या कडेला महिलांसाठी स्वच्छतागृहे नसल्याचे निदर्शनास आले. एखाद्या ठिकाणी असल्यास तिथे अस्वच्छता असते. त्यामुळे महिलांची मोठी कुचंबणा होते. याचा प्रत्यय स्वत: मलाच आल्याची कबुली देत यापुढे महामार्गाच्या कडेला महिलांसाठी स्वच्छतागृहे उभारावी, यासाठी प्रयत्न करणार असून सरकारकडे तसा प्रस्ताव मांडणार असल्याचे त्या म्हणाल्या. महिलांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.