राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याविषयी कोणी काही बोलले तर तो महाराष्ट्राचा अपमान ठरतो. पण इतर महिलांचा अपमान झाल्यावर कोणी काही बोलत नाही. मग या महिला रस्त्यावर पडल्यात का?, अशी निवडक महिलांबाबतची भूमिका योग्य नाही. हा चुकीचा पायंडा आहे, भाजप ते कदापिही खपवून घेणार नाही, असा इशारा भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी येथे पत्रकार परिषदेत बोलताना दिला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> बुलढाणा : “भाजपा व संलग्न संघटना या अफवा फैलावणाऱ्या संस्था”; यशोमती ठाकूर यांची टीका

चित्रा वाघ म्हणाल्या, अनेक महिलांना कमरेखालच्या शिव्या दिल्या जातात, त्यांचा भलेही राजकीय पक्षांशी संबंध नसेल, पण त्यांच्या बाबतीत कुणी कसे बोलत नाही. आम्ही नौटंकी करत नाही. आम्हालाही वाट्टेल ते बोलले जाते, पण कोणावरही कारवाई होत नाही. स्वप्ना पाटकर या कोणत्याही राजकीय पक्षाच्या नव्हत्या. त्यांच्यासोबत काय झाले? त्यांनी किती घाणेरड्या शिव्या देण्यात आल्या. तेव्हा कोणी म्हटले का, महाराष्ट्राचा अपमान झाला. कंगणा रनौत हिचे घर पाडण्यात आले. त्यानंतर ‘उखाड के फेक दिया’ असे म्हटले गेले. तेव्हादेखील काय झाले. केतकी चितळेला एक महिना तुरुंगामध्ये टाकण्यात आले होते. तिच्या आई-वडिलांना जाऊन भेटा, बघा त्यांची अवस्था काय झाली आहे? त्यांची काय चूक होती. मी या सगळ्या महिलांना जाऊन भेटले आहे. त्या सगळ्यांचे दु:ख मला माहिती आहे.

व्यक्तिस्वातंत्र्य आहे की नाही?

तुम्ही केतकी चितळेच्या पोस्टचं समर्थन करता का, असे पत्रकारांनी विचारले असता चित्रा वाघ म्हणाल्या की, ती पोस्ट केतकी चितळेने लिहिली होती का? तुम्ही या तांत्रिक बाबी तपासून पहा. तुमच्या घरातील एखाद्या व्यक्तीला फेसबुक पोस्टमुळे तुरुंगामध्ये टाकले, तर तुमची भूमिका काय असेल? आपल्याकडे व्यक्तिस्वातंत्र्य आहे की नाही, असा सवाल चित्रा वाघ यांनी उपस्थित केला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp chitra wagh express her view on humiliation of women in a press conference zws