वाशीम : महाविकास आघाडीच्या काळात फेसबुकवर पोस्ट टाकली म्हणून एका युवतीला कारागृहात टाकले, संजय राऊतांनी एका महिलेला शिव्या घातल्या, पुण्यातील एका महिलेच्या मोटारीत पिस्तूल ठेवली. तो महिलांचा अपमान नव्हता का ? एकीकडे महिला सन्मानाच्या गोष्टी हाकायच्या तर दुसरीकडे महिलांना हिन वागणूक द्यायची, ही सामाजिक विकृती आहे. महिलांचा मान, सन्मान झालाच पाहिजे. परंतु ठराविक महिलेलाच बोलले म्हणून महाविकास आघाडीकडून आगपाखड केली जाते, अशी टीका भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश अध्यक्ष चित्रा वाघ यांनी येथे केली.
चित्रा वाघ विदर्भाच्या दौऱ्यावर असून आज, बुधवारी वाशीम येथील सर्किट हाऊस येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी राजु पाटील राजे, शाम बढे, नागेश घोपे, दिपीका देशमुख, खटके आदींची उपस्थिती होती. राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर केलेल्या टीकेबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी राज्यात ‘सिलेक्टेड आऊट्रेड’ चालणार नसल्याचे सांगितले. राज्यात अडीच वर्षे केवळ ऑनलाईन सरकार होते. शिंदे-फडणवीस सरकार सर्वसामान्य जनतेचे सरकार असल्यामुळे ते जनतेत जाऊन कामे करीत आहे, असे वाघ यांनी सांगितले.
४५ खासदार आणि २०० आमदार हेच भाजपचे लक्ष
महिला मोर्चाच्या माध्यमातून संपूर्ण राज्यात दौरे करुन संघटनवाढीसाठी विशेष प्रयत्न करणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत ४८ लोकसभा मतदार संघापैकी ४५ लोकसभा मतदार संघ व २८८ विधानसभा मतदार संघापैकी २०० च्यावर मतदार संघात भाजप लढणार असून केवळ लढणारच नाही तर जिंकणार असल्याचा दावा चित्रा वाघ यांनी यावेळी केला.
मंत्रिमंडळात लवकरच महिलांना संधी
राज्यात भाजप सत्तेत आहे. परंतु एकाही महिलेला मंत्रिमंडळात संधी देण्यात आली नाही. याबाबत बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या, राज्याच्या मंत्रिमंडळात लवकरच महिलांना संधी मिळेल. सध्या महिला व बालकल्याण मंत्री पदावर मंगलप्रभात लोढा आहेत. त्यांना कळू द्या, महिलांच्या समस्या काय आहेत.