पूर्व आणि दक्षिण नागपूरवर दावा
मित्रपक्ष अनुक्रमे शिवसेना व राष्ट्रवादीने पूर्व आणि दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघावर दावा केल्याने भाजप व काँग्रेसच्या इच्छुकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. दक्षिण व पूर्वमध्ये भाजपचे विद्यमान आमदार आहेत, तर गेल्या निवडणुकीत या दोन्ही मतदारसंघात काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर होती.
आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना युती तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी समोरासमोर दिसणार आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने प्रत्येकी १२५ जागा लढण्याचे आणि उर्वरित जागा मित्रपक्षाला देण्याचा निर्णय घेतला आहे. पश्चिम महाराष्ट्रात वजन असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचा नागपुरात फार जोर नाही. या पक्षाचे शहरात एकदाच ११ नगरसेवक निवडून आले होते. ही सर्वोच्च संख्या होती. आज या पक्षाचा एक नगरसेवक आहे. दक्षिण नागपुरात राष्ट्रवादीने गेल्या वेळेस माजी आमदार दीनानाथ पडोळे यांना उमेदवारी दिली होती. परंतु काँग्रेसकडून आलेल्या पडोळे यांना अत्यल्प मते मिळाली होती. मात्र, पक्षाध्यक्ष जयंत पाटील यांनी या दोन मतदारसंघापैकी एकतरी राष्ट्रवादीला मिळावा, असा आग्रह धरला आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये अवस्थतता आहे. पूर्व नागपुरातून काँग्रेसकडून अॅड. अभिजित वंजारी आणि उमाकांत अग्निहोत्री तयारी करीत आहेत. वंजारी यांनी गेल्या पाच वर्षांत विविध मेळावे, सभा, निदर्शने करून चर्चेत राहण्याचा प्रयत्न केला आहे. अग्निहोत्री यांनी हिंदी भाषकांवर लक्ष केंद्रित करून कार्यक्रम आयोजित केले. दक्षिण नागपूरमध्ये माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार यांचे सुपुत्र उमेदवारीसाठी आग्रही आहेत. त्यांनी अलीकडे या मतदारसंघात कार्यक्रमाची गती वाढवली आहे. तसेच अलीकडे काँग्रेसमध्ये सामील झालेले प्रमोद मानमोडे हे या मतदारसंघातून इच्छुक आहेत. त्यांनी देखील गेल्या काही दिवसांपासून विविध कार्यक्रम आयोजित करून जनसंपर्क वाढवला आहे. काँग्रेसकडून इच्छुकांची तयारी सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसने या दोनपैकी एक जागा मिळावी यासाठी प्रयत्न चालवले आहे. त्यामुळे या दोन मतदारसंघात तयारी लागलेल्या काँग्रेसच्या इच्छुकांमध्ये अस्वस्थता आहे.
काँग्रेसला गेल्या निवडणुकीत पूर्वमध्ये ५५ हजार आणि दक्षिण मध्ये ३६ हजार मते मिळाली होती. तसेच गेल्या पाच वर्षांत या दोन्ही मतदारसंघात पक्षाने संघटन बांधणी केली आणि जनसंपर्क वाढवला आहे. त्यामुळे पक्षाने या जागांबद्दल निर्णय घेताना स्थानिक नेत्यांशी चर्चा करावी, असे काँग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे म्हणाले. पूर्वमध्ये महापालिकेतील गटनेते दुनेश्वर पेठे हे सक्षम उमेदवार आहेत. तर दक्षिणमध्ये माजी नगरसेवक राजू नागुलवार आहेत. याशिवाय मध्य नागपुरात देखील आमची तयारी आहे. केवळ पक्षाच्या आदेशाची प्रतीक्षा आहे, असे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अनिल अहिरकर म्हणाले.
दक्षिणमध्ये दावेदार अधिक
युतीला नागपुरातून एकतरी जागा मिळावी म्हणून शिवसेनेचे प्रयत्न आहेत. नगरसेवक किशोर कुमेरिया आणि माजी उपमहापौर शेखर सावरबांधे, किरण पांडव यांनी दक्षिण नागपूरमध्ये उमेदवारी मागितली आहे. भाजपने लोकसभेत सर्वाधिक मते घेतलेल्या पूर्व नागपूरसाठी देखील शेखर सावरबांधे आणि किरण पांडव यांनी अर्ज केला आहे. मात्र, पूर्व नागपूरची जागा भाजप सोडणार नाही, याची कल्पना असल्याने दक्षिणवर सर्वाचा जोर दिसून येत आहे. या मतदारसंघासाठी भाजपकडून तयारीत असलेल्यांमध्ये अवस्थता आहे.