नागपूर: नागपूर जिल्ह्यातील रामटेक लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने अचानक पत्रकार परिषद घेऊन अपक्ष उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला आहे. वंचितच्या उमेदवाराचे भाजप कनेक्शन आणि त्याने अपक्षाला दिलेला पाठिंबा यामागे असलेली राजकीय खेळी याची नागपूर, रामटेकच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रामटेक लोकसभा मतदारसंघात मविआचे श्यामकुमार बर्वे आणि भाजप- शिंदे गट युतीचे राजू पारवे यांच्यात थेट लढत आहे. या शिवाय कॉंग्रेस बंडखोर किशोर गजभिये, व वंचित बहुजन आघाडीचे शंकर चहांदे रिंगणात आहेत. शनिवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत गजभिये यांनी वंचितकडे उमेदवारीसाठी प्रयत्न केले होते. परंतु वंचितने शंकर चहांदे यांना बी फॉर्म दिला. गजभिये अपक्ष लढणार हे स्पष्ट झाले असतानाच चार दिवसांत वंचितने यू टर्न घेऊन पक्षाचा उमेदवार (शंकर चहांदे) असतान अपक्ष किशोर गजभिये यांना पाठिंबा जाहीर केला. विशेष म्हणजे हे सर्व घडवून आणण्यामागे कोण असावे याचा शोध घेतला असता त्याचे कनेक्शन भाजपशी जुळताना दिसतात.

हेही वाचा – पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नागपूर दौऱ्यात बदल ?

हेही वाचा – मराठा आरक्षण निश्चितीनंतर परीक्षा? ‘एमपीएससी’च्या  निर्णयामुळे नाराजी

वंचितने ज्यांना रामटेकमधून उमेदवारी दिली ते शंकर चहांदे मुळचे भाजपचेच. ते भाजपचे जिल्हा परिषद सदस्य होते. भाजपची जिल्हा परिषदेत सत्ता असताना समाज कल्याण सभापती होते. लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यावर त्यांनी वंचितमध्ये प्रवेश केला होता. लगेच त्यांना उमेदवारी मिळाली. महाविकास आघाडीकडे जाणारी मते वंचितकडे वळवण्याचा प्रयत्न होता. तोपर्यंत गजभिये कुठेही चर्चेत नव्हते. पण गजभिये हे कॉंग्रेस बंडखोर असल्याने ते अधिक मते घेतील आणि वंचित व गजभिये यांच्यात दलित मतांचे विभाजन होण्याची शक्यता होती व त्याचा फायदा कॉंग्रेसला होणार हे लक्षात आल्यावर वरिष्ठ पातळीवर सुत्रे हलली. वंचितांच्या उमेदवाराने गजभिये यांना पाठिंबा देण्याचा निर्णय झाला. या निर्णयाची घोषणा करण्यासाठी पत्रकार परिषद बोलावण्यात आली. ज्या हॉटेलमध्ये वंचितने पत्रकार परीषद घेतली ते भाजप नेत्यांचे आहे हे येथे उल्लेखनीय.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp connection of vanchit candidate support to independent candidate what is the politics of ramtek cwb 76 ssb