गडचिरोली : जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने चालू वर्षात सरसकट हेक्‍टरी २० हजार रुपये बोनस जाहीर केला होता. यामुळे बोनस वाटपातील अनियमिततेवर आळा बसेल, अशी अपेक्षा होती. परंतु या प्रक्रियेतील अधिकारी आणि खरेदी-विक्री संघातील सदस्यांनी मिळून भूमिहीन व्यक्तींच्या खात्यावर प्रत्येकी ४० हजार रुपये जमा करून ते पैसे परस्पर काही खात्यांवर वळते केल्याची माहिती आहे. यामाध्यमातून एकट्या चामोर्शी तालुक्यात कोट्यावधींचा बोनस घोटाळा करण्यात आला, अशी तक्रार भाजप सहकार आघाडीचे जिल्हाध्यक्ष आशीष पिपरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> Maharashtra elections 2024 : अमरावती : विधानसभा निवडणूक! भाजपची पाच जागांवर अडचण…

गेल्या काही वर्षांपासून धान भरडाई घोटाळा, तांदूळ तस्करी यासारख्या प्रकारामुळे शासनाला कोट्यवधींचा फटका बसत आहे. अशातच आता धान उत्पादक शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या बोनसमध्ये देखील कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होत आहे. सहकार आघाडीचे जिल्हाध्यक्ष  पिपरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या घोटाळ्या संबंधित दस्तऐवज सादर करून चौकशीची मागणी केली आहे. त्यामुळे खरेदी विक्री संघ आणि जिल्हा मार्केटिंग फेडरेशन यांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे. पिपरे यांनी तक्रारीत केलेल्या दाव्यानुसार, चामोर्शी तालुका खरेदी विक्री संघाने भूमिहीन व्यक्तींच्या नावे शेती दाखवून त्यांच्या खात्यावर प्रत्येकी ४० हजार रुपये जमा केले. त्यानंतर संबंधित व्यक्तींना दोन ते तीन हजार देऊन उर्वरित रक्कम इतरत्र वळती करण्यात आली. याप्रकरणी काही बोगस लाभार्थ्यांचे खाते तपासले असता हा प्रकार उघडकीस आला. अशा प्रकारच्या बोगस लाभार्थ्यांची यादीच तक्रारीत देण्यात आलेली आहे. यासंदर्भात जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांना वारंवार तक्रार करूनही त्यांनी कोणतीही कारवाई केलेली नाही. त्यामुळे या घोटाळ्यात त्यांचा देखील सहभाग नकारता येत नाही. सदर प्रकार गंभीर असून या प्रकरणाची विशेष समितीमार्फत चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी पिपरे यांनी केली आहे. यावर उपमुख्यमंत्री कार्यालयाकडून गडचिरोली जिल्हा पोलीस अधीक्षकांना चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

हेही वाचा >>> Model Code of Conduct in Maharashtra Elections 2024 : आचारसंहितेत काय करता येते, काय करता येत नाही?

जिल्हाभर व्याप्ती

गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धान्याचे उत्पादन घेतले जाते. त्यामुळे दरवर्षी खरेदी-विक्री संघामध्ये मोठी उलाढाल होत असते. हा केवळ चामोर्शी तालुक्याचा प्रश्न नसून या घोटाळ्याची व्याप्ती जिल्हाभर असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे योग्य चौकशी झाल्यास यात अनेक मोठे मासे अडकण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

घोटाळ्याच्या आरोपात तथ्य नाही. ही प्रक्रिया संपूर्णपणे ऑनलाइन असल्याने यात कुणाचाही हस्तक्षेप होऊच शकत नाही. विश्वनाथ तिवाडे, जिल्हा मार्केटिंग अधिकारी.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp cooperative aghadi complaint dcm devendra fadnavis over paddy bonus scam ssp 89 zws