अकोला : काँग्रेसच्या समितीवरून भाजपने नागपूर व अकोला दंगलीचे कनेक्शन जोडले आहे. नागपूर दंगल प्रकरणात काँग्रेसच्या समितीत अकोला पश्चिमचे आमदार साजिद खान पठाण यांचा समावेश आहे. याच मुद्द्यावरून भाजपने काँग्रेसच्या वर्मावर बोट ठेवले. काँग्रेसचा नवा कारनामा असून एका दंगलीतील मुख्य आरोपी दुसऱ्या दंगलीत शांतता प्रस्थापित करणार, अशा शब्दात भाजपने काँग्रेसवर खरमरीत टीका केली. या संदर्भात समाजमाध्यमावरील अधिकृत पानावर भाजपने पोस्ट प्रसारित केली आहे.
नागपुरातील महाल परिसरात १७ मार्च २०२५ रोजी रात्री दोन धार्मिक गटात दंगल उसळली. नागपूरमधील या हिंसाचारामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नागपूर दंगल प्रकरणामुळे राज्यातील सामाजिक व राजकीय वातावरण ढवळून निघाले. या दंगल प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न आहे. दरम्यान, नागपूर दंगलीच्या पार्श्वभूमीवर संबंधित भागाला भेट देऊन स्थिती जाणून घेण्यासह शांतता पुनर्स्थापित करण्याच्या दृष्टीने प्रयत्न होण्यासाठी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार समिती गठीत करण्यात आली. या समितीमध्ये अकोला पश्चिमचे काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांचा समावेश आहे. याच मुद्द्यावरून आता भाजपने काँग्रेसला घेरले.
मे २०२३ मध्ये अकोल्यातील जुने शहर भागात मोठी दंगल उसळली होती. या प्रकरणात साजिद खान पठाण यांचा सहभाग असल्याचा आरोप भाजपने सुरुवातीपासून केला. अकोला दंगल प्रकरणात साजिद खान पठाण मुख्य आरोपी असल्याचा दावा भाजपने करून विधानसभा निवडणुकीत देखील हा मुद्दा उचलून धरला होता. दरम्यान, तब्बल २९ वर्षे अधिराज्य गाजवणाऱ्या भाजपला अकोला पश्चिममध्ये पराभवाचा सामना करावा लागला. काँग्रेसचे साजिद खान पठाण यांनी भाजपच्या विजय अग्रवाल यांचा अवघ्या एक हजार २८३ मतांनी पराभव केला.
हा पराभव भाजपच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. आता नागपूर दंगलीनंतर पुन्हा भाजपने याच मुद्द्यावरून काँग्रेसवर निशाणा साधला. नागपूर दंगल प्रकरणातील काँग्रेसच्या समितीमध्ये साजिद खान पठाण यांची नियुक्ती केल्याच्या मुद्द्यावरून भाजपने काँग्रेसवर जोरदार टीकास्त्र सोडले. ‘एका दंगलीचा मुख्य आरोपी दुसऱ्या दंगलीत शांतता प्रस्थापित करणार,’ अशा शब्दात भाजपने काँग्रेसला टोला लगावला. या प्रकरणावरून भाजप व काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा जुंपण्याची चिन्हे आहेत. नागपूर दंगलीच्यानिमित्ताने अकोल्यात घडलेले दंगल प्रकरण पुन्हा एकदा प्रकाशझोतात आल्याचे चित्र आहे.