वर्धा : जिल्ह्यात चारही जागा निवडून आल्या यापेक्षा देवळीत कमळ उगवले याचाच काकणभर अधिक आनंद भाजप धुरीनांना झाल्याचे दिसून येते. आजवर एकदाही ईथे भाजपला विजय मिळू शकला नव्हता. पराभव होण्यामागे भाजपचेच नेते कारणीभूत राहत असल्याचा ठपका असायचा. पॉकेटबाज नेते म्हणून संभावना झालेले नेते घात करतात, हे वरिष्ठ नेते पण कबूल करायचे. म्हणून ही जागा गत निवडणुकीत सेनेला गेली. पण पराभव झाल्याने यावेळी भाजपनेच देवळी मतदारसंघात उमेदवारी घ्यावी, असा विचार बळावला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

क्षेत्रातील सर्व नेते पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पोहचली. विनवणी केली की यावेळी आम्ही एकजूट ठेवू. उमेदवाऱी राजेश बकाने यांनाच मिळावी, असा एकमुखी स्वर प्रकटला. तेव्हा फडणवीस यांनी स्पष्ट केले की जागा मित्रपक्ष शिंदे सेनेकडून मागू. पण निवडून आणणार का, असा सवाल करीत फडणवीस यांनी स्पष्ट केले की ही शेवटची संधी. यावेळी यश आले नाही तर ही जागा कायमची मित्र पक्षाला देऊन टाकणार. ही मात्रा लागू पडल्याचे पुढे दिसून आले. जिल्हाध्यक्ष सुनील गफाट व प्रभारी सुधीर दिवे लक्ष ठेवून होते. गफाट यांना तर फडणवीस यांच्या सभेत जिल्हाध्यक्ष असूनही हजर होता आले नाही. उपद्रवी म्हटल्या जाणाऱ्या नेत्यांचा बंदोबस्त केल्या गेला. काहींना मतदारसंघातून हद्दपार करण्यात आले. दोन जिल्हा परिषद प्रभागनिहाय प्रत्येक नेत्यावर जबाबदारी टाकण्यात आली. कुठेही काही कमी पडू नये म्हणून गफाट सतर्क होते. हा राजकीय भविष्याचाच प्रश्न असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते, असे गफाट सांगतात. त्यामुळे कसून काम करणाऱ्यांनी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांच्या गावात मतांचा आलेख उंचावला. विजय चालून आला.

हेही वाचा…धक्कादायक! मद्यधुंद पोलीसाने बैलगाडीसह शेतकऱ्याला चिरडले ; दोन बैल आणि शेतकऱ्याचा घटनास्थळी मृत्यू गावकऱ्यांची पोलिसाला मारहाण

अन्य एक मुख्य कारण म्हणजे काँग्रेस उमेदवार रणजित कांबळे यांच्या विषयी असलेली नाराजी लक्षात घेऊन काही काँग्रेस नेत्यांची मदत पदरात पाडून घेण्यास भाजपला यश आले. अखेर देवेंद्र फडणवीस यांना दिलेला शब्द पूर्ण करण्यात देवळीकर नेत्यांना यश आले. आमदार राजेश बकाने म्हणतात की विजयी झालो म्हणून माफ असे नाही तर एकही नेत्यावर मी काम नं केल्याचा ठपका ठेवू शकत नाही. सर्व राबले व फत्ते झाले. पक्ष नेत्यांनी अभूतपूर्व एकजूट दाखविली. आता त्या सर्वांच्या अपेक्षित विकास कामे करण्याच्या अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी माझी.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp dhurins were happier about the lotus blooming in the devali than winning four seats pmd 64 sud 02