पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सतत कार्यक्रम देणारा राजकीय पक्ष, अशी भाजपची ओळख दिल्या जाते. लोकसभा निवडणुकीनंतर मंडळ व अन्य स्वरूपातील बैठका आटोपल्या. आता पक्षाच्या इतिहासात एक नवा अध्याय जोडल्या जात आहे. भाजपचे राष्ट्रीय व राज्य अधिवेशन होत असतात. आता प्रथमच जिल्हा अधिवेशन होऊ घातले आहे. २ ते ५ ऑगस्ट दरम्यान राज्यातील सर्व जिल्ह्यात अशी जिल्हा अधिवेशन होणार आहेत. पक्ष स्थापनेपासून जुळलेल्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले की, जिल्हा कार्यकारिणी बैठक होत असते. मात्र पक्षाचे जिल्हा अधिवेशन प्रथमच होत आहे.
हेही वाचा >>> नागपूर: भीसी, लकी ड्रॉच्या नावावर गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा चुना; अंगणवाडी सेविका, आशासेविकांच्या माध्यमातून…
लोकसभा निवडणुकीत यशाने हुलकावणी दिल्याने पक्षात मरगळ आली आहे. विधानसभेत काय होणार, याची चिंता व्यक्त होत आहे. कार्यकर्त्यांनी हिंमत हारू नये, त्यांच्यात विश्वास निर्माण व्हावा, विजयाचे ध्येय ठेवून त्यांनी कामाला लागावे, यासाठी हा जिल्हा अधिवेशनाचा घाट घातल्या गेल्याचे बोलल्या जात आहे.
हेही वाचा >>> तुमचा दूधवाला दुधात भेसळ करतो का? मग त्याला सांगा आता ‘एमपीडीए’…
वर्धा जिल्हा अधिवेशन ३ ऑगस्ट रोजी सरोज मंगलम या सभागृहात सकाळी दहा वाजता आरंभ होईल. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, जिल्हा प्रभारी असलेले आमदार मदन येरावार, पूर्व विदर्भ संघटन महामंत्री उपेंद्र कोठेकर, लोकसभा क्षेत्र प्रमुख सुमित वानखेडे, ओबीसी मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष संजय गाते, आमदार सर्वश्री डॉ. पंकज भोयर, समीर कुणावार, दादाराव केचे, माजी खासदार रामदास तडस, माजी आमदार रामदास आंबटकर,जिल्हाध्यक्ष सुनील गफाट प्रामुख्याने संबोधणार. अधिवेशनास विधानसभा क्षेत्र प्रमुख, राष्ट्रीय व राज्य कार्यकारिणी सदस्य, पतसंस्था संचालक, सर्व शक्ती केंद्रप्रमुख व अन्य निमंत्रित आहे. जिल्ह्यात वर्धा, देवळी, आर्वी व हिंगणघाट असे चार विधानसभा मतदारसंघ आहेत. देवळी सोडून तीन ठिकाणी भाजप आमदार आहेत. आता पक्षाचा खासदार नाही. जिल्हा शंभर टक्के भाजपमय करण्याचा निर्धार वारंवार व्यक्त केल्या जातो. लोकसभा निवडणूक पराभवाने त्यास ठेच बसली. आता आहे ते तरी सांभाळून ठेवले पाहिजे, अशी भूमिका असल्याचे एका नेत्याने नमूद केले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नं झाल्याने कार्यकर्ते सैरभैर झाल्याचे म्हटल्या जाते. त्यांना पक्षाशी बांधून कसे ठेवणार, हा प्रश्न संघटनेचे लोकं करीत असतात. या निराश कार्यकर्त्यांचा रोष या अधिवेशनात दिसू नये अशी काळजी घेतल्या जात आहे.