नागपूर शहर कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष शेख हुसेन यांच्याविरुद्ध भारतीय जनता पक्षाने नागपूर आणि बडनेरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. हुसेन यांच्याविरुद्ध पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत वादग्रस्त विधान केल्याचा आरोप आहे.
नागपुरात भाजप नेते व माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि शहराध्यक्ष व आमदार प्रवीण दटके यांनी गिट्टीखदान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली तर अमरावतीत प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी व प्रदेश कार्यकारिणी सदस्य जयंत डेहणकर यांनी बडनेरा पोलिसांत तक्रार दाखल केली.
काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी यांना सक्त वसुली संचालनालयाने बजावलेल्या नोटीसच्या विरोधात सोमवारी काँग्रेसने नागपुरात ईडी कार्यालयापुढे आंदोलन केले होते. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना शेख हुसेन यांची जीभ घसरली होती.त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले होते. त्यांच्या भाषणाची चित्रफित समाज माध्यमांवर प्रसारित झाल्यावर भाजप नेत्यांनी मंगळवारी शेख हुसेन यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करून कारवाईची मागणी केली. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना बावनकुळे यांनी, सायंकाळपर्यंत हुसेन यांना अटक न केल्यास आंदोलनाचा इशाराही दिला आहे.
माजी आमदार असा उल्लेख
नागपुरात भाजप नेत्यांनी पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत शेख हुसेन यांचा उल्लेख माजी आमदार असा केला आहे. परंतु ते माजी आमदार नाहीत. त्यामुळे भाजप नेत्यांना हुसेन कोण आहेत याची माहिती नसावी, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.