नागपूर: काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांच्या विरोधात भाजपचे शहर अध्यक्ष बंटी कुकडे यांनी गणेशपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. प्रसार माध्यमामधून खोटी माहिती पसरवण्याचा गुन्हा त्यांच्यावर दाखल करावा, अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे.

लोंढे यांनी प्रशांत कोरटकर यांच्यासोबत छायाचित्र असलेला प्रशिक पडवेकर हा भाजप कार्यकर्ता असल्याची खोटी माहिती प्रसार माध्यमांना देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बदनामी केली आहे. तसेच लोंढे यांनी माध्यमांना दिलेल्या वक्तव्यामुळे दोन गटात तेढ निर्माण होऊन शांतता भंग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे  लोंढे यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी तक्रारीद्वारे करण्यात आली.

यावेळी आमदार कृष्णा खोपडे,  आमदार प्रवीण दटके व भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. तक्रारीनुसार, पडवेकर हा भाजपचा पदाधिकारी नाही हे लोंढे यांना माहीत असूनही त्यांनी प्रसार माध्यमात खोटी माहिती दिली. यामुळे राज्यातील शिवप्रेमींचे मन दुखावले आहे. तसेच लोंढे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावरही खोटा आरोप केला आहे. त्यामुळे लोंढे यांच्यावर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी या तक्रारीत करण्यात आली आहे. तक्रार देताना भाजप महामंत्री गुड्डू त्रिवेदी, राम अंबुलकर, श्रीकांत अगलावे,अर्चना डेहनकर आदींची उपस्थिती होती.