या दोन्ही घटना तशा आठ दिवसांपूर्वीच्या. त्यातली पहिली नागपुरातील तर दुसरी वर्ध्याजवळच्या देवळीतील. एकाचे नायक नितीन गडकरी तर दुसरीचे रामदास तडस. नागपुरातील पक्ष कार्यालयाच्या भूमिपूजन सोहळ्यात गडकरी म्हणाले, पक्षात जातींचे सेल नकोत. आपली जात एकच ती म्हणजे पक्ष. त्यामुळे अध्यक्ष असताना जी चूक मी केली ती बावनकुळेंनी करू नये. या वक्तव्याबद्दल गडकरींचे अभिनंदन करावे तेवढे थोडेच. अशी टाळ्या घेणारी वक्तव्ये त्यांच्या तोंडून नेहमी बाहेर पडतात. मात्र यामुळे वास्तव बदलते का? या बोलण्याला कृतीची जोड गडकरी नेहमी देतात, जातपात मानत नाहीत पण प्रत्यक्षात पक्ष व परिवार या मुद्यावर बदलला का? याची उत्तरे शोधायला गेले की रामदास तडसांचे प्रकरण समोर येते. ते बहुजनांचे प्रतिनिधी. पक्षाचे माजी खासदार. गेली अनेक वर्षे पक्षात सक्रिय असलेले. त्यांना रामनवमीच्या दिवशी राममंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश नाकारला. कारण काय तर त्यांनी सोवळे व जानवे घातले नव्हते म्हणून. याचा गवगवा झाल्यावर मंदिराच्या पुजाऱ्याला उपरती झाली व त्याने तडसांची माफी मागितली. तडसांनी सुद्धा वाद मिटला असे जाहीर केले. मात्र यातून ज्या वर्चस्ववादी मनोवृत्तीचे दर्शन झाले त्याचे काय? तडस हे आजही खासदार असते तर या मुद्याला वाचा फोडण्याची त्यांची हिंमत झाली असती काय? हा वाद उभा झाल्यावर त्याला बहुजन विरुद्ध अभिजन असा रंग येतोय हे लक्षात येताच परिवारातील धुरीण कसे सक्रिय झाले व त्यांनी प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न कसा केला याच्या सुरस कथा आताही चवीने चर्चिल्या जाताहेत. यातून नेमके काय दिसते? हा पक्ष व त्याच्याभोवती उभ्या असलेल्या परिवारात बहुजनांना कमी लेखण्याची प्रवृत्ती अजून गेलेली नाही हेच ना! या पार्श्वभूमीवर गडकरींचा जात त्यागण्याचा आग्रह पाण्यावरचा बुडबुडा ठरतो त्याचे काय?
आता काही लोक म्हणतील की देवळीतले मंदिर व भाजपचा संबंध काय? वरकरणी हा प्रश्न रास्तच. मात्र प्रत्यक्षातील स्थिती नेमकी काय? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने शताब्दीच्या निमित्ताने देशभरातील सर्व मंदिराच्या व्यवस्थापनात सक्रिय सहभाग नोंदवा असा आदेशच परिवाराला दिलाय. यात गैर काही नाही. संघाच्या दृष्टीने धर्माच्या एकीकरणासाठी हे आवश्यकच. मात्र ती ताब्यात घेताना त्या परिसरातील सर्वांना सोबत घ्यायचे. ते करताना कुठलाही जातिभेद पाळायचा नाही असेही संघ म्हणतो. प्रत्यक्षात देवांच्या देखभालीची वेळ आली की पुन्हा एकदा वर्चस्ववादाची भूमिका समोर येते. हा बहुजनांवरचा अन्याय नाही का? यावरून कुणी ‘यांचे खायचे व दाखवायचे दात वेगळे’ असा आरोप केला तर तो चुकीचा कसा ठरू शकतो? भाजप हा पूर्वी अभिजनांचा पक्ष म्हणून हिणवला गेला. नंतर व्यापाऱ्यांचा. त्यातून बाहेर पडण्यासाठी पक्षनेत्यांनी प्रचंड मेहनत घेतली हे निर्विवादपणे मान्य. आज हा पक्ष बहुजनांचा म्हणून ओळखला जातो. तडस ज्या प्रवर्गातून येतात तो ओबीसीच या पक्षाचा प्रमुख आधार व मतपेढी सुद्धा! ही प्रतिमा निर्माण केल्यावर ती टिकून राहावी म्हणून भाजप कायम दक्ष असतो. पक्षात महत्त्वाच्या पदांवर ओबीसींना प्राधान्य देणे, सरकारात सामील करून घेणे या बाबी प्रकर्षाने पाळल्या जातात. असे केले नाही तर पक्ष वाढणार नाही याची जाणीव साऱ्यांना आहे. तरीही आक्षेपाचा एक मुद्दा उरतोच.
सत्ता आल्यावर अन्य क्षेत्रातील लाभाची पदे अभिजनांच्याच वाट्याला कशी काय जातात? एखाददुसरा अपवाद वगळता सारे कुलगुरू एकाच वर्गातले कसे? सरकारची बाजू मांडणारे वकील तेच का? विविध प्राधिकरणे, शैक्षणिक वर्तुळातील उच्चपदे एकाच वर्गाला का? महत्त्वाच्या धोरणात्मक पदांवर अंतस्थ गोटातील माणसे व जिथे मेहनत करून पक्ष वाढवायचा तिथे बहुजन हे स्पष्ट दिसणारे धोरण योग्य कसे ठरवता येईल? यावर हा परिवार व पक्ष कधीतरी विचार करेल का? या पक्षाने सत्तेचा फायदा बहुजनांना करून दिला. त्यांच्या उन्नतीसाठी अनेक निर्णय घेतले हे कबूल. मात्र हे करताना प्रतिष्ठेची पदेही या वर्गाला मिळतील असा व्यापक दृष्टिकोन का स्वीकारला नाही? तसे केले असते तर मंदिर वा अन्य ठिकाणी दिसणारी वर्चस्ववादाची भावना गळून पडली असती. तडसांना असे सुनावण्याची हिंमत अभिजनांचे प्रतिनिधित्व करणाऱ्यांना झाली नसती. तडसांना प्रवेश नाकारणारे भलेही या पक्षात सक्रिय नसतील पण त्यांचे विचार कुणाच्या जवळ जाणारे हे कुणालाही सहज कळणारे. पूर्वी रामनवमीची यात्रा पक्षीय अभिनिवेशापासून दूर असायची. आता त्यात राजकीय हेतू शिरला. इतका की यात्रेत मोठ्या संख्येत सहभागी व्हा असे आदेशच दिले जातात. म्हणजे यात्रेत गर्दी जमावी, त्या माध्यमातून शक्तिप्रदर्शन दिसावे यासाठी तडस हवेत पण राममूर्तीच्या गाभाऱ्यात मात्र ते नकोत. याचा अर्थ राजसत्ता तुमच्या हवाली केली पण धर्मसत्तेवर मात्र आमचेच नियंत्रण. हे भाजप व परिवाराला मान्य आहे का? परिवाराचे सोडा पण उठसूठ बहुजनवादाच्या गप्पा करणाऱ्या भाजपला हे परवडणारे आहे का?
सोवळे, जानवे या प्रथा नंतर निर्माण झाल्या. राम तर त्याच्या कितीतरी आधीचा. मग रामाला बहुजनांपासून दूर ठेवण्याचा विचार कशासाठी? हा वैचारिक बुरसटलेपणा नाही का? दुर्दैव हे की ही चलाखी धर्मप्रेमाने भारावलेल्या बहुजनांच्या लक्षात कधी येत नाही. ती येऊ नये असाच प्रयत्न असतो. त्यामुळे तडसांच्या अपमानावर तत्काळ पांघरुण घातले जाते. ही घटना पुढे विस्मृतीत जाईलही पण अजून कायम असलेल्या वर्चस्ववादाच्या भावनेचे काय? ती नष्ट व्हावी याची जबाबदारी नेमकी कुणाची? भाजप वा परिवाराला आणखी सर्वव्यापी व्हायचे असेल तर ही भावना मारक ठरेल याची कल्पना नाही का? किंवा असेल तरी ही भावना व त्यातून येणारी अधिकार गाजवण्याची वृत्ती सोडायची नाही असे काही ठरलेले आहे का? गडकरींनी ज्याचा उल्लेख केला ती जात तर फारच नंतरची गोष्ट झाली. आधी या भावनेला तिलांजली द्यावी लागेल नंतरच जातीचा मुद्दा विचारार्थ घेता येईल. पक्षातून जात हद्दपार व्हावी हा त्यांचा मुद्दा योग्यच पण निवडणुकीच्या राजकारणातून ती कशी होणार? आजही भाजपसकट सर्वच पक्ष उमेदवारी देताना याचाच विचार करतात. ज्या तडसांचा इथे उल्लेख झाला त्यांनाही ते कोणत्या प्रवर्गातून येतात याचा विचार उमेदवारी देताना झालाच की! त्यामुळे पक्षातले जातीचे सेल बंद झाले तरी जातविरहित राजकारण अंमलात येणे सध्यातरी अशक्य. त्या दृष्टीने विचार करायचा असेल तर आधी वर्णव्यवस्थेचा त्याग करावा लागेल. संपूर्ण मानवजात एक असा विचार समाजात रुजवावा लागेल. त्याची तयारी भाजप व त्यामागे उभा असलेला परिवार दाखवणार का?