अकोला : महसूलमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आमदारांचे फोन उचलत नाहीत. त्यांच्यासह भाजपचे चार मंत्री काहीच कामाचे नाहीत, अशी खरमरीत टीका राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका करताना आपण काय करतो? याचे देखील भान राखले गेले पाहिजे, असा सल्ला देखील त्यांनी दिला. संबंधित मंत्र्यांविरोधात मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पत्र देणार असल्याचे त्यांनी सांगितले. सत्ताधारी आमदारांनीच टीकास्त्र सोडल्याने महायुतीतील मतभेद उघड झाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महसूलमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न आमदार अमोल मिटकरी यांनी केला होता. त्याला राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिसाद न दिल्याने अमोल मिटकरी यांनी संताप व्यक्त केला आहे. मिटकरी म्हणाले, ‘जिल्ह्यातील एका प्रश्नावर चर्चा करण्यासाठी राधाकृष्ण विखे पाटील यांना वारंवार भ्रमणध्वनीद्वारे संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यांचे स्वीय सहाय्यक, ओएसडी किंवा निवासस्थानातील कोणाकडूनही प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी तहसीलदारांशी संपर्क साधला. हे फक्त विखे पाटलांबद्दल नाही तर भाजपचे गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण, सुरेश खाडे यांच्याबाबतही हाच अनुभव आला. भाजपचे चार मंत्री काहीच कामाचे नाही.’

हेही वाचा – केंद्रीय अर्थसंकल्पात नागपूरला काय मिळाले? मेट्रोला निधी, नागनदीचे पुनरुज्जीवन आणि बरेच काही

राष्ट्रवादीचे मंत्री महायुतीतील सर्व पक्षांच्या आमदारांची मदत करतात. मात्र, भाजपचे मंत्री राष्ट्रवादीच्या आणि शिवसेनेच्या आमदारांना सहकार्य करत नाहीत. जाणीवपूर्वक ही गोष्ट केली जात आहे, असा आरोप अमोल मिटकरी यांनी केला.

…याचेही भान ठेवा

महाविकास आघाडी सरकारमधील तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आमदारांना उपलब्ध होत नसल्याचा आरोप भाजपने सातत्याने केला. त्यांनी व्हीसीद्वारे कारभार केल्याची टीका देखील केली होती. आता तोच कित्ता भाजपचे मंत्री गिरवत आहेत. भाजपचे मंत्री आमदारांना सहकार्य करीत नाहीत. उद्धव ठाकरेंवर टीका करताना आता आपण काय करतोय, याचे देखील भान ठेवा, असा टोला आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपला लगावला. आमदार अमोल मिटकरी यांच्या खरमरीत टीकेमुळे महायुतीमध्ये मिठाचा खडा पडून वाद आणखी चिघळण्याची चिन्हे आहेत.

हेही वाचा – संदीप शेळके यांच्या हाती मशाल, ‘मातोश्री’वर उद्धव ठाकरेंच्या हस्ते बांधले शिवबंधन

दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या सूचनांना केराची टोपली

महायुतीतील घटक पक्षांमध्ये संबंध बिघडतील असे वक्तव्य करू नये, अशी तंबीवजा सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी केली होती. आमदार अमोल मिटकरी यांनी याकडे दुर्लक्ष करून भाजप मंत्र्यांवर निशाणा साधला आहे. त्यामुळे महायुतीमध्ये वाद होण्याची शक्यता आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp four ministers are of no use amol mitkari slams mahayuti ppd 88 ssb
Show comments