लवकरच युती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार करण्यात येणार असून भाजपने आपल्याला मंत्रिपद देऊ केले आहे, असा दावा करून बहुजन रिपब्लिकन एकता मंचच्या अध्यक्ष माजी मंत्री अॅड. सुलेखाताई कुंभारे यांनी आता राजकारणापासून स्वत:ला दूर ठेवण्यासाठी मंत्रिपद स्वीकारणार नसल्याचे आज जाहीर केले.
जगविख्यात ड्रॅगन पॅलेसच्या वर्धापन दिन कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी त्यांनी शनिवारी रवी भवनात पत्रकार परिषद घेतली. या वेळी त्या म्हणाल्या की, आता राजकारणापासून मन विटले आहे. आता आपण लोकांच्या समस्या सोडविणे आणि बुद्ध धम्माच्या प्रचार व प्रसारासाठी वाहून घेणार आहोत. यापुढे आपण राजकारणापासून दोन हात लांबच राहण्याचा प्रयत्न करणार असून कोणतेही मंत्रिपद, महामंडळ स्वीकारणार नाही, तसेच कोणतीच निवडणूकही लढविणार नाही, असे त्या म्हणाल्या. पण माध्यमांच्या प्रतिनिधींनी पुन्हा प्रश्न केल्यावर मात्र त्यांनी निवडणूक न लढविण्याचे विधान तात्काळ मागे घेतले.
ड्रॅगन पॅलेसचा १६वा वर्धापन दिन २५ नोव्हेंबरला साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्त दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन ड्रॅगन पॅलेसच्या ठिकाणी करण्यात आले आहे. बुद्धिस्ट पर्यटन सर्किटमध्ये दीक्षाभूमी, ड्रॅगन पॅलेस आणि रामटेकचा समावेश आहे. त्या अनुषंगाने ड्रॅगन पॅलेस हे जागतिक कीर्तीचे पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट थीम पार्क आणि जागतिक दर्जाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेंशन सेंटरसाठी राज्य सरकारला २१४ कोटी ५० लाखांचा प्रस्ताव पाठविला असून तो राज्य सरकारने केंद्र सरकारकडे सादर केला आहे.
भाजपकडून मंत्रिपदाच्या प्रस्तावाचा कुंभारेंचा दावा
लवकरच युती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार करण्यात येणार असून भाजपने आपल्याला मंत्रिपद देऊ केले आहे
Written by रत्नाकर पवार
आणखी वाचा
First published on: 22-11-2015 at 02:23 IST
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp give me ministry sulekha kumbhare