भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युतीच्या सरकारला आज सत्तेत येऊन एक वर्ष पूर्ण होत आहे. या वर्षभरात शहरातील कायदा व सुव्यवस्था आणि न्यायपालिका क्षेत्रातील युती सरकारची कामगिरी ‘कही खुशी, कही गम’ अशी संमिश्र आहे.
या सरकारला सर्वात मोठा धक्का हा प्रा. मल्हारी मस्के प्रकरणाने बसला. या घटनेतील प्रमुख आरोपी सुमीत ठाकूर हा भाजयुमोचा उपाध्यक्ष होता. त्यामुळे सुमीतच्या अनुषंगाने भाजपची संपूर्ण महाराष्ट्रभर बदनामी झाली आणि भाजपची शहर कार्यकारिणी ढवळून निघाली. तर प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात पांडे ले-आऊट येथे राहणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मेव्हणे किशोर तोतडे यांच्या घरी १७ एप्रिलला झालेली चोरी, सोनेगाव पोलीस ठाण्याच्या क्षेत्रातील पावनभूमी येथील रहिवासी बाळकृष्ण गणपतराव मोरे आणि कुटुंबीयांच्या घरावर २९ ऑगस्ट रोजी पडलेला दरोडा आणि ३ ऑक्टोबर रोजी तात्याटोपेनगर येथील वसुंधरा बाळ यांच्या खून प्रकरणांचा छडा लावण्यात पोलिसांना अद्याप यश आले नाही. शहराला लाभलेले नवीन पोलीस आयुक्त एस. पी. यादव यांना गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यात काही प्रमाणात यश आले आहे. महाधिवक्ता सुनील मनोहर यांचा राजीनामा चटका लावणारा ठरला.
– कळमना, मानकापूर, शांतीनगर या तीन नवीन पोलीस ठाण्यांना मंजुरी.
– सुरक्षेसाठी दृष्टीने राज्य शासनाला सीसीटीव्हीचा प्रस्ताव सादर.
– खुनांच्या घटनांमध्ये घट.
– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शब्दानुसार नागपूरच्या न्यायपालिकेतील शिक्षेच्या प्रमाणात वाढ झाली.
– महाधिवक्तापदी नागपुरातील वरिष्ठ अधिवक्ता सुनील मनोहर यांची प्रथम आणि त्यानंतर विदर्भवादी वरिष्ठ अधिवक्ता श्रीहरी अणे यांची नियुक्ती.
– महिलांसाठी विशेष महिला पोलीस ठाण्यांचा प्रश्न जैसे थे.
– शहरातील पोलीस ठाण्यांवर प्रशासनाचे नियंत्रण नाही.
– महिला आणि लहान मुलांच्या विरोधातील गुन्ह्यांमध्ये वाढ.
– भाजपच्या कार्यकर्त्यांच्या गुंडगिरीत वाढ.
– जिल्हा व सत्र न्यायालयाची सुरक्षा आणि नवीन इमारतींचा प्रस्ताव धुळखात.