काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या दीड दशकाच्या सत्ताकाळानंतर राज्यात झालेला सत्ताबदल आणि सरकारचे नेतृत्त्व करण्याची नागपूरकर देवेंद्र फडणवीस यांना मिळालेली संधी यामुळे राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरची मान गौरवाने उंचावली होती. आता नागपूचा विकास होईलच आणि ‘आपला’ मुख्यमंत्री त्यासाठी प्रयत्न करतीलच अशीच सर्वाना अपेक्षा होती. या पाश्र्वभूमीवर फडणवीस सरकार शनिवारी एक वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करीत आहे. या वर्षभरात नागपूरकर मुख्यमंत्री म्हणून या शहराला काय मिळाले, सत्ता असणाऱ्या भाजपला काय मिळाले, त्यांनी केलेल्या घोषणांना मूर्त रूप मिळाले का? याचा आढावा या निमित्ताने आम्ही घेतला. यात सरकारकडून करण्यात आलेल्या काही चांगल्या बाबीं पुढे आल्या तर त्यांनी केलेल्या काही घोषणा केवळ कागदावरच राहिल्या असेही दिसून आले. राष्ट्रीय पातळीवरच्या काही संस्था नागपुरात सुरू झाल्याने हे शहर देशाच्या पातळीवर आले. पण मूलभूत सुविधांच्या पातळीवर सत्ताबदल झाल्यावरही काहीच चित्र बदलले नाही. संघटनात्मक पातळीवर भाजपला एक वर्षांत विशेष असे काही करून दाखविता आले नाही. पण काही नेत्यांमुळे पक्षाची प्रतिमा मात्र डागाळली.