ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. २०२४ पर्यंत देशातील प्रमुख विरोधी नेत्यांना तुरुंगात टाकण्याचं धोरण मोदी सरकारचं असल्याचं दिसतंय. विरोधी पक्ष एकत्र येत आहेत, त्यामुळे केंद्र सरकारच्या पायाखालची जमीन दुभंगली आहे, अशी टीका संजय राऊतांनी केली. ते नागपूर येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
खरं तर, नागपूर येथे महाविकास आघाडीची ‘वज्रमूठ’ सभा होणार आहे. येथील दर्शन कॉलनीच्या मैदानावर सभेची जोरदार तयारी सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर संजय राऊत आज नागपुरात आले होते. यावेळी त्यांनी सभास्थळाची पाहणी केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
हेही वाचा- “माझ्या भीतीने हे लोक…”, संजय राऊतांचा नागपुरातून भाजपा नेत्यांना टोला
मोदी सरकारवर टीकास्र सोडताना संजय राऊत म्हणाले, “विरोधी पक्षाचे जे प्रमुख नेते आहेत, त्यांना २०२४ पर्यंत तुरुंगात टाकायचं, असं एकंदरीत धोरण दिसत आहे. याचं कारण असं आहे की, विरोधी पक्ष एक होत असल्याने त्यांच्या पायाखालची जमीन दुभंगली आहे. आम्ही सगळे एकत्र येत आहोत. त्या भीतीपोटी विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्यांना तुरुंगात टाकायचं आणि कदाचित निवडणुका होऊ द्यायच्या नाहीत किंवा एकतर्फी निवडणुका घ्यायच्या, अशा प्रकारे हुकूमशाही पद्धतीचं काम सध्या दिल्लीतून सुरू आहे.”
हेही वाचा- राधाकृष्ण विखे-पाटलांवर अरविंद सावंतांची बोचरी टीका; थेट ‘या’ प्राण्याशी केली तुलना, म्हणाले…
नागपूरमध्ये महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा होणार आहे. दर्शन कॉलनीच्या मैदानावर अतिविराट सभेचे आयोजन केलं आहे. नागपूरकर आणि विदर्भाला अति विराट सभेचे दर्शन होईल. या सभेबद्दल नागपूरकर आणि विदर्भात अतिशय उत्सुकता आहे. नागपुरच्या सभेतून महाराष्ट्राच्या पुढच्या राजकारणाची दिशा ठरेल, असा दावा राऊतांनी यावेळी केला.