शाळा, क्रीडांगणाचा विकास; नगरसेवकांची दिल्ली भेट
नागपूर : दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाच्या सरकारने शाळा, क्रीडांगण विकास आणि आरोग्य सुविधांच्या क्षेत्रात केलेला विकास सध्या देशभर कौतुकाचा विषय ठरला असून हाच पॅटर्न नागपूर महापालिका राबवणार आहे. यासाठी क्रीडा व शिक्षण समिती प्रमुखांच्या नेतृत्वात नगरसेवकाचे एक शिष्टमंडळ दिल्लीला भेट देऊन आले असून ते यासंदर्भातील अहवाल सादर करणार आहेत.
राजकीय पातळीवर आम आदमी पार्टी आणि भारतीय जनता पक्ष परस्परांचे विरोधक असले तरी विकास कामांच्या बाबत मात्र या दोन्ही पक्षांनी राजकीय विरोध बाजूला सारण्याचे ठरवले आहे, असे चित्र आहे. यापूर्वी नागपुरातील चोवीस तास पाणीपुरवठा योजनेसह इतरही काही प्रकल्प पाहण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री व आपचे नेते अरविंद केजरीवाल नागपूरला येणार होते. मात्र, त्यांचा ऐनवेळी दौरा रद्द झाला होता. आता भाजपची सत्ता असलेल्या महापालिकेतील नगरसेवक दिल्ली सरकारच्या योजनांची पाहणी करून आले असून क्रीडांगण विकास व शाळा सुधारणा प्रकल्प नागपुरात राबवण्याचा प्रयत्न करणार आहे.
महापालिकेच्या शाळांच्या वाईट अवस्थेमुळे दिवसेंदिवस विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी होत आहे. त्याचा परिणाम म्हणून शाळा बंद पडत आहेत. क्रीडांगणाची अवस्था चांगली नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शहरातील सर्व क्रीडांगणे विकसित करण्याचे निर्देश दिले होते. या पाश्र्वभूमीवर आम आदमी पक्षाने दिल्लीमध्ये विकसित केलेल्या शाळा आणि तेथील क्रीडांगणे पाहण्यासाठी महापालिकेच्या शिक्षण समितीचे सभापती दिलीप दिवे आणि क्रीडा समितीचे सभापती नागेश सहारे यांच्या नेतृत्वाखाली एकूण १३ सदस्य नुकतेच दिल्लीला गेले होते. त्यांनी तेथील शाळा, रुग्णालये आणि क्रीडांगणाची पाहणी केली. दिल्लीतील खासगी शाळांपेक्षा शासकीय शाळांमध्ये अधिक सुविधा आहेत. याचा अभ्यास करून नगरसेवक अहवाल देणार आहे. यासंदर्भात शिक्षण समितीचे सदस्य राजेंद्र सोनकुसरे म्हणाले, दिल्लीमधील महापालिकेच्या अनेक शाळांमध्ये सीबीएसई अभ्यासक्रम सुरू करण्यात आले. त्यासाठी सुविधा निर्माण केल्या आहेत. शिवाय क्रीडांगणे सुद्धा विकसित करण्यात आली आहेत. तेथील सरकारी रुग्णालयामध्ये माफक दरात अत्याधुनिक सोयी निर्माण केल्या आहेत. या धर्तीवर महापालिका प्रकल्प राबवणार आहे.
‘‘महापालिकेच्या शिक्षण आणि क्रीडा समितीचे सदस्य दिल्ली येथील शाळा, क्रीडांगणे आणि रुग्णालयाची पाहणी करण्यासाठी गेले होते. त्या ठिकाणी केलेला विकास बघता त्यातील चांगल्या योजना नागपूर महापालिकेत राबवण्याचा मानस आहे.’’
– नागेश सहारे, सभापती, क्रीडा समिती