पक्षांतर्गत बंडखोरी थोपवण्याचे आव्हान; मतविभागणी टाळण्याचे विरोधकांचे प्रयत्न

लोकसभा ते नगरपालिका या निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशामळे इतर पक्षांतून भाजपमध्ये येणाऱ्या नेत्यांची संख्या वाढल्याने जिल्हा परिषदांवरही भगवा फडकविण्याचा जोरदार प्रयत्न भाजपने सुरू केला आहे. मात्र ग्रामीण राजकारणावर अजूनही पकड कायम असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी या आव्हानाला कसे तोंड देते यावरच  निवडणुकीचे चित्र अवलंबून असणार आहे.

कधीकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या विदर्भातील सहा जिल्हा परिषदांमध्ये निवडणुका होत आहेत. त्यात प्रामुख्याने पश्चिम विदर्भातील बुलढाणा, अमरावती आणि यवतमाळ तर पूर्व विदर्भातील वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्हा परिषदेचा समावेश आहे. या सहा जिल्हा परिषदांपैकी वर्धा आणि चंद्रपूर या दोन जिल्हा परिषदांचा अपवाद सोडला तर बुलढाणा, गडचिरोली, अमरावती आणि यवतमाळ जिल्हा परिषदेवर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची सत्ता आहे. शहरी पक्ष म्हणून ओळख असलेल्या भाजपने लोकसभा ते नगरपालिकांच्या निवडणुकीत मिळविलेल्या घवघवीत यशामुळे आणि काँग्रेस-राष्ट्रवादीत असलेल्या निराशेच्या वातावरणामुळे या पक्षाची ग्रामीण भागावर पकड असलेली नेतेमंडळी भाजपमध्ये जाऊ लागली आहे. त्यामुळे या पक्षाची ग्रामीण भागातील शक्ती वाढली आहे. याला काँग्रेस-राष्ट्रवादी कसे तोंड देते हे पाहणे या निवडणुकीत महत्त्वाचे ठरणार आहे.

बंडखोरी होऊ नये म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादी तसेच भाजप आणि शिवसेना स्वबळावर लढत असून अनेक स्थानिक आघाडय़ाही रिंगणात उतरल्याने सर्वच ठिकाणी बहुरंगी लढतीचे सध्या तरी चित्र आहे. पश्चिम विदर्भात ग्रामीण भागात काँग्रेस, राष्ट्रवादीच्या पाठोपाठ शिवसेनेची ताकद आहे व त्यानंतर भाजपचा क्रम लागतो. पूर्व विदर्भात शहरी भागासोबत ग्रामीण भागातही भाजप कार्यकर्त्यांची फळी आहे. काँग्रेसची ताकद याच भागात आहे.

बुलढाणा जिल्हा परिषदेत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची सत्ता आहे. ६० जागांसाठी ५५३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. येथे आघाडीची सत्ता असली तरी हे दोन्ही पक्ष स्वबळावर लढणार आहेत. या जिल्हा परिषदेवर आतापर्यंत काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता कायम राहिली असून विरोधकांना तेथे झेंडा फडकावण्यात अद्याप तरी यश आले नाही. या वेळी मात्र चित्र वेगळे आहे. सेनेने आणि भाजपने येथे जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत.

यवतमाळ जिल्हा परिषदेच्या एकूण ६१ पैकी ५५ जागांवर निवडणुका आहेत. येथे काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता आहे. या जिल्ह्य़ातील काँग्रेस-राष्ट्रवादीचे ग्रामीण भागावरील पकड असणारे बहुतांश नेते भाजपवासी झाले आहेत. त्यामुळे दुसऱ्या पिढीतील कार्यकर्त्यांच्या जोरावरच येथे काँग्रेसची मदार आहे. विद्यमान जिल्हा परिषदेत काँग्रेस आघाडीकडे ४३ चे संख्याबळ आहे, शिवसेनेच्या १२ जागा आहेत.

बच्चू कडू यांची भूमिका महत्त्वाची

अमरावती जिल्हा परिषदेत ५९ जागा आहेत. सध्या येथे आघाडीची सत्ता आहे. येथे अपक्ष आमदार व प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांची भूमिका महत्त्वाची ठरणारी आहे. भाजपने अमरावती जिल्हा परिषदेवर सत्ताप्राप्तीसाठी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. पक्षाचे नेते व राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील, मोशीचे आमदार डॉ. बोंडे यांच्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे. जिल्ह्य़ात सेनेचीही ताकद असून युती तुटल्याचा फटका या जिल्ह्य़ात दोन्ही पक्षांना बसण्याची शक्यता आहे.

पूर्व विदर्भातील वर्धा जिल्हा परिषदेत भाजपची सत्ता आहे. एकूण ५२ जागांसाठी ३५९ अर्ज आले आहेत. आघाडी करण्याबाबत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील घोळ शेवटपर्यंत कायमच राहल्याने अखेर काँग्रेसने आपल्या उमेदवारांना कामाला लावले.

गडचिरोली जिल्हा परिषदेवर काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता आहे. येथे ३३ जागांसाठी २७७ अर्ज आले आहेत. सध्या या जिल्ह्य़ात खासदार आणि सर्व आमदार भाजपचे आहेत. या जिल्ह्य़ात राष्ट्रवादीची ताकद आहे. पक्षाचे नेते धर्मरावबाबा आत्राम यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. काँग्रेसला गटबाजीचे ग्रहण लागले आहे. पक्षाने वसा-पोर्ला जिल्हा परिषद क्षेत्रातून बंडोपंत मल्लेलवार यांना त्यांच्यावर असलेल्या गुन्हेगारीच्या आरोपावरून उमेदवारी नाकारली आहे. मात्र काँग्रेसने येथे पक्षाचा उमेदवार दिला नाही. मल्लेलवार यांनी राष्ट्रीय समाज पार्टीकडून एबी फार्म मिळविण्याचा प्रयत्न केला, तो यशस्वीही झाला, पण शेवटच्या क्षणी रासपने माघार घेतली. भाजपमध्येही येथे धुसफुस आहे. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संतोष कुमरे यांना उमेदवारी नाकारली आहे, तर ब्रह्मपुरी तालुका काँग्रेस अध्यक्ष प्रभाकर सेलोकर यांनी राजीनामा देऊन नाराजी व्यक्त केली आहे.

  भाजपमध्ये अंतर्गत नाराजी

चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या ५६ जागांसाठी ४३१ उमेदवारांनी अर्ज सादर केले आहेत. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांचा हा जिल्हा आहे. पक्षाने जि.प.चे माजी अध्यक्ष संतोष कुमरे यांना चुनाळा-विरूर मतदारसंघातून उमेदवारी नाकारल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ब्रह्मपुरीचे भाजपचे दलित आघाडी शहर अध्यक्ष राजविलास श्यामकुळे यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. दलितांना या पक्षात स्थान मिळत नसल्यामुळे येत्या काळात आंबेडकरी विचारांच्या पक्षात कार्य करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे, श्यामकुळे यांनी अहेर नवरगांव क्षेत्रातून पक्षाकडे उमेदवारी मागितली होती, मात्र त्यांना ती नाकारण्यात आली. नागपूर येथून चंद्रपुरात आयात केलेला आमदार चालतो, तर आम्ही का नाही, असाही प्रश्न यानिमित्ताने भाजपच्या वर्तुळात उपस्थित केला जात आहे.

Story img Loader