मुख्यमंत्रिपदाचा वापर करून शहराचा कायापालट करण्यावर देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला भर, दुसरीकडे केंद्रातील मंत्रिपदाचा मतदारसंघाच्या विकासाकरिता उपयोग करून घेण्याचे नितीन गडकरी यांचे सुरू असलेले प्रयत्न, मेट्रो रेल्वेसह विविध प्रकल्प, या विकासकामांच्या आधारावरच नागपूर महानगरपालिकेवर पुन्हा भाजपचा झेंडा फडकविण्याची तयारी भाजपने सुरू केली आहे. दुसरीकडे निवडणुका तोंडावर आल्या तरी काँग्रेसमधील गटबाजी काही केल्या कमी होण्याची  चिन्हे नाहीत.

राजकीय कारकीर्दीच्या सुरुवातीला तरुण वयातच महापौरपद भूषविलेले फडणवीस आपल्या कार्यक्षेत्रातील महानगरपालिका हातची जाऊ देणार नाहीत हे नक्की. यासाठी फडणवीस यांनी गेले वर्षभर तयारी सुरू केली आहे. केंद्र व राज्यातील सत्तेची जोड त्यांना लाभली आहे. दहा वर्षांपासून महापालिकेवर भाजपची सत्ता आहे. मेट्रो रेल्वे, स्मार्ट सिटी, सिमेंट रस्ते, उड्डाण पूल, सांडपाणी प्रक्रिया केंद्रासह केंद्रातील राष्ट्रीय शैक्षणिक संस्था, एम्स, मिहानमधील प्रकल्प अशा हजारो कोटींच्या योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. शासनाच्या माध्यमातून समाधान शिबीर, आरोग्य शिबीर आयोजित करून त्याचा पक्षाच्या प्रचारासाठी भाजपने पद्धतशीरपणे वापर करून घेतला आहे. त्याचबरोबर संघटनात्मक पातळीवर यंत्रणा बळकट करण्यावर भर देण्यात आला आहे.  शहरातील सर्व सहाही मतदारसंघात भाजपचेच आमदार आहेत. खुद्द मुख्यमंत्री नागपूरच्या नियमित संपर्कात आहेत. विविध योजनांच्या प्रचारामुळे शहर बदलत आहे असा भास निर्माण करण्यात सध्यातरी भाजपने यश मिळविले आहे.

फडणवीस विरुद्ध गडकरी विभागणी?

सध्या तरी भाजपला सारे वातावरण अनुकूल आहे. फक्त उमेदवारीचे वाटप करताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. पक्षाच्या आशा पल्लवीत झाल्याने इच्छुकांची संख्याही मोठी आहे. उमेदवार जाहीर झाल्यावर मोठय़ा प्रमाणात बंडखोरी होण्याची शक्यता आहे.  याची खात्री असल्यानेच पक्षाच्या नेत्यांनी आतापासूनच सावधगिरीने पावले उचलणे सुरू केले आहे. पक्षात उघडपणे गटबाजीही नसली तरी नेत्यांची विभागणी ही गडकरी गट आणि फडणवीस गट अशीच केली जात आहे.

विरोधी पक्ष विस्कळीत

भाजपला रोखण्यासाठी विरोधी पक्ष एकत्रित नाहीत, महापालिकेतील प्रमुख विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसची पाच वर्षांतील कामगिरी दखलपात्र ठरणारी नाही. पक्षाचे दोन ज्येष्ठ नेते सतीश चतुर्वेदी आणि नितीन राऊत यांनी वेगळी चूल मांडली आहे. विरोधी पक्ष नेते आणि शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या नेतृत्वाला पक्षातूनच वारंवार आव्हान दिले जात आहे. त्यामुळे भाजपविरुद्ध लढताना प्रथम काँग्रेसलाच संघटित व्हावे लागणार आहे. याही स्थितीत काँग्रेसने निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. सर्व प्रभाग समित्या तयार करून कार्यकर्त्यांना कामी लावण्यात विकास ठाकरे यांना सध्यातरी यश आले आहे. भाजपप्रमाणेच  तिकीट वाटपाचा मुद्दा काँग्रेससाठीही अडचणीचा ठरणारा आहे. नवीन प्रभाग पद्धतीत अनेक वॉर्ड एकत्रित करण्यात आल्याने काही नगरसेवकांना दुसरा वॉर्ड शोधावा लागणार आहे.

नागपूरला रिपब्लिकन चळवळीचा इतिहास आहे. दलित मतांची संख्याही लक्षणीय आहे. उत्तर नागपूर, मध्य नागपूरमध्ये ही मते निर्णायक ठरतात. पूर्वी काँग्रेसकडे ही मते वळत होती. बसपाने कार्यकर्त्यांच्या माध्यमातून स्वत:ची मतपेढी तयार केली आहे. बसपा हा महापालिकेत काँग्रेसनंतर दुसरा सर्वात मोठा पक्ष आहे. यंदाही सर्वच जागा लढण्याचा संकल्प या पक्षाने केला आहे. कट्टर कार्यकर्ते ही या पक्षाची सर्वात मोठी शक्ती आहे. मात्र उमेदवारी वाटप कसे होते यावरच याही पक्षाची सर्व समीकरणे अवलंबून आहे. दोनऐवजी चार वॉर्डाचा एक प्रभाग केल्याने त्याचा सर्वच पक्षांना फटका बसला आहे. अपक्षांच्या गडांना तडे गेले आहे. ते नवीन पक्षाच्या शोधात आहेत. महापालिकेत अपक्षांचा गट नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावत आला आहे. यावेळी काही अपक्ष नगरसेवक भाजपकडे, तर काही काँग्रेसकडे गेले आहेत आणि काही जाण्याची शक्यता आहे.

बहुजन समाज पक्ष सर्व जागा लढविणार आहे. जेथे पक्षाचे कॅडर आहे तेथे कार्यकर्त्यांना संधी दिली जाईल आणि जेथे कॅडर नाही तेथे इतरांचा विचार केला जाईल. शहरात ७० वॉर्डात समित्या तयार करण्यात आल्या आहेत.   नागोराव जयकर, अध्यक्ष बसपा, नागपूर शहर

untitled-14

Story img Loader