भंडारा आणि गोंदिया जिल्ह्य़ांतील सहा नगरपालिका आणि नगर पंचायतींच्या निवडणुकांमध्ये विजय प्राप्त करीत भाजपने लोकसभा निवडणुकीपासून सुरू झालेली विदर्भातील विजयाची परंपरा कायम राखली आहे. विधान परिषद निवडणुकीपाठोपाठ नगरपालिका निवडणुकीतही राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांना मोठा धक्का बसला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भंडारा जिल्ह्य़ात भंडारा, तुमसर, पवनी आणि साकोली तर गडचिरोली जिल्ह्य़ात गडचिरोली आणि देसाईगंज या सहा पालिकांची निवडणूक रविवारी पार पडली. सहाही पालिकांमध्ये भाजपने आपली पकड अधिक घट्ट केल्याचे तर राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांची घसरण झाले. भाजपला मिळालेले हे यश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह भाजपचे भंडाऱ्याचे खासदार नाना पटोले, भंडाऱ्यातील मंत्री राजकुमार बडोले तसेच गडचिरोलीतील सर्व भाजप नेत्यांसह राज्यमंत्री अम्बरीशराजे आत्राम यांच्या प्रयत्नांना जाते.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील यशानंतर भंडारा आणि गोंदिया या दोन्ही जिल्हा परिषदांमधील सत्ता भाजपला गमवावी लागली होती. या दोन्ही जिल्हा परिषदांमधील पराभव भाजपने गांभीर्याने घेतले होते. तेव्हा झालेल्या चुका दुरुस्त करण्यात आल्या. पक्षात समन्वय वाढविण्यात आला.

या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेचा धुव्वा उडाला. विशेष म्हणजे भंडारा जिल्ह्य़ात राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांना मोठा धक्का बसला. गेल्या १५ वर्षांपासून भंडारा पालिकेवर राष्ट्रवादीची सत्ता होती, यावेळी भाजपने त्यांना धूळ चारली. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर मागे पडला. नगरसेवकपदाच्या एकूण ३३ जागांपैकी १५ जागा जिंकून भाजप पहिल्या क्रमांकावर, १० जागा जिंकून राष्ट्रवादी दुसऱ्या तर चार जागा जिंकून काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर आहे. तुमसर नगरपालिकेमधील सत्ता राष्ट्रवादीला गमवावी लागली.

जिल्ह्य़ातील तुमसर येथे राष्ट्रवादीची तर पवनीत राष्ट्रवादी व सेना आघाडीची सत्ता होती. या दोन्ही  ठिकाणी राष्ट्रवादीला पराभवाचा सामना करावा लागला. पवनी वगळता सर्व ठिकाणी भाजपने भगवा फडकाविला आहे. पवनी पालिकेत स्थानिक विकास आघाडीला लोकांनी कौल दिला. साकोलीत प्रथमच निवडणुका झाल्या. भाजपला १७ पैकी ११ तर काँग्रेसला प्रत्येकी एका जागेवर समाधान मानावे लागले. जिल्ह्य़ात शिवसेनेला फक्त पवनी नगर परिषदेत एक जागा मिळाली.

गडचिरोली जिल्ह्य़ात लोकसभा आणि विधानसभेत भाजपला घवघवीत यश मिळाले होते. पालिका निवडणुकीतही पक्षाने ते कायम राखले. गडचिरोली आणि देसाईगंज या दोन्ही पालिकांमध्ये भाजपचे नगराध्यक्ष निवडून आले आणि पक्षाने बहुमतही प्राप्त केले आहे.

गडचिरोलीत भाजपने २५ पैकी २१ जागा जिंकून पूर्ण बहुमत प्राप्त केले. येथे राष्ट्रवादीला एकही जागा मिळाली नाही, मागच्या पालिकेत त्यांच्याकडे सहा जागा होत्या. काँग्रेसला फक्त एकाच जागेवर समाधान मानावे लागले.

देसाईगंज पालिका निवडणूक ही राज्याचे मंत्री महादेव जानकर यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यावर आणलेल्या दबावामुळे वादग्रस्त ठरली होती. याप्रकरणी जानकर यांच्या विरोधात प्राथमिक माहिती अहवाल (एफ.आय.आर.) पोलिसात दाखल झाला आहे. १७ पैकी १२ जागा आणि नगराध्यक्षाची निवडणूक जिंकून भाजपने बाजी मारली आहे. गटबाजीमुळे येथे काँग्रेसला चार जागांवर समाधान मानावे लागले. मागच्या पालिकेत काँग्रेसच्या सहा जागा होत्या. राष्ट्रवादीला फक्त एक जागा मिळाली. गडचिरोली जिल्ह्य़ातील निवडणुकीची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर सोपविली होती.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp in vidarbha in municipalities and nagar panchayat election