अमरावतीत भाजप कार्यकर्त्यांनी आमदाराच्या कार्यालयात केलेली तोडफोड व गोंदियात भाजप नगरसेवकाने आमदाराला केलेली मारहाण या दोन्ही घटना भाजप हा इतरांपेक्षा वेगळा पक्ष नाही, या दाव्याचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या आहेत. सत्तेचा कैफ मोठा विचित्र असतो. त्याला विधायक मार्गाने नेण्यासाठी रचनात्मक दृष्टिकोन लागतो. त्यासाठी सत्ता मिळूनही पाय जमिनीवर ठेवावे लागतात. नेमका त्याचाच विसर भाजपमधील काहींना पडला की काय, अशी शंका आता यायला लागली आहे. २५ वर्षांपूर्वीचा तो काळ आठवा. तेव्हा याच पक्षाच्या नेत्यांनी साऱ्या राज्यात दौरे करून सत्ताधारी काँग्रेसच्या राजकीय गुन्हेगारीकरणाचा पाढा जनतेसमोर वाचला होता. मोठमोठय़ा गुंडांची नावे नेत्यांसोबत जोडत मतपरिवर्तन घडवून आणले होते. हे करताना आमचा पक्ष सज्जनांचा व इतरांपेक्षा वेगळा, हे सांगायला ही मंडळी विसरत नव्हती. तेव्हा सत्ता आली आणि भूर्रकन निघून गेली. पुन्हा विरोधात असलेल्या या पक्षाने नंतर हाच राग आळवला. आता सत्ता येताच त्याच्या नशेचा कैफ अमरावती व गोंदियातील घटनांमधून प्रकट होऊ लागला आहे.
भाजपमधील कार्यकर्त्यांच्या गुंडगिरीचे प्रदर्शन केवळ या दोनच शहरात झाले, असे नाही. नागपुरात तर वर्षभरापासून ही गुंडगिरी अनेकदा अनुभवास आली आहे. अमरावतीचे अपक्ष आमदार रवी राणा यांची सध्याची ओळख भाजपचे समर्थन करणारे आमदार, अशी आहे. त्यांनी पालकमंत्री प्रवीण पोटेंच्या कानशिलात लगावण्याचा उल्लेख केला आणि भाजप कार्यकर्त्यांना संताप अनावर झाला म्हणे! सत्ता असली की, असा संताप लवकर अनावर होतो. आजवर सुसंस्कृतांचे शहर, अशी ओळख असलेल्या अमरावतीला या राडय़ाने गालबोट लावले. ज्या पालकमंत्र्यांसाठी हे कार्यकर्ते राणांच्या कार्यालयावर भगव्या झेंडय़ाचा आधार घेत चालून गेले ते मंत्रीही मूळचे भाजपचे नाहीच. शिक्षणसम्राट असलेले हे मंत्री विधान परिषदेत निवडून येण्याची ‘क्षमता’ या केवळ एकाच निकषावर भाजपमध्ये प्रवेश करते झाले. पक्षाच्या एखाद्या सच्च्या नेत्यासाठी हे चालून जाणे एकदाचे समजून घेता आले असते, पण स्थिती तशी नव्हती तरीही राणांना मनगट दाखवण्याचा प्रकार घडला. मग राणा समर्थकांनी त्याची परतफेड दगडफेक करून केली.
गोंदियात तर पत्रकारांच्या समक्ष काँग्रेस आमदार गोपाल अग्रवालांना बदडण्यात आले. ज्याने हा पराक्रम केला तो शिव शर्मा निवडून येण्याची क्षमता नसलेला भाजपचा स्वीकृत नगरसेवक आहे.
विशेष म्हणजे, तज्ज्ञांच्या गटातून त्याची पालिकेत वर्णी लावण्यात आली. कदाचित मारहाणीतील तज्ज्ञ म्हणून त्याला भाजपने निवडले असावे. गोंदिया असो वा अमरावती, या दोन्ही ठिकाणच्या गुंडगिरीचे मूळ जनतेच्या प्रश्नाशी संबंधित नाही. गोंदियात एका कंत्राटावर वाद होता, तर अमरावतीत पुतळ्याचे राजकारण आडवे आले.
नवे सरकार आल्यावर सुद्धा सामान्य जनतेचे मूलभूत प्रश्नांशी झगडणे अजिबात कमी झालेले नसताना सत्ताधारी भाजपचे स्थानिक पदाधिकारी कंत्राट व अस्मितेच्या प्रश्नावर हात उगारत असतील तर हा पक्ष इतरांपेक्षा वेगळा कसा? स्वत:ला सभ्य व सुसंस्कृत म्हणवून घेणाऱ्या याही पक्षात गुंडगिरीची बिजे खोलवर रुजलेली आहेत, हेच यातून दिसून येते. मुख्यमंत्र्यांचे शहर असलेल्या उपराजधानीत सुद्धा याच गुंडगिरीचा प्रत्यय गेल्या वर्षभरात अनेकदा आलेला आहे. प्राध्यापकाची गाडी जाळणारा भाजयुमोचा कार्यकर्ता असो की, कृष्णनगरातील गरिबांना अतोनात छळणारा भाजपचा पदाधिकारी असो, या साऱ्यांनी सत्ताधाऱ्यांच्या गुंडगिरीची पताका फडकावण्यात मोठा हातभार लावला आहे, यावर कुणाचे दुमत होण्याचे काही कारण नाही. मुख्यमंत्र्यांनी कठोर भूमिका घेतल्याने हे सत्ताधाऱ्यांच्या वळचणीला लटकलेले गुंड पदाधिकारी तुरुंगात अथवा तडीपार झाले असले तरी त्यांचे काही भाऊबंद अजूनही प्रकाशमान होत असतात. शासनाच्याच एका मंडळाचा अध्यक्ष असलेल्या अजनीपुत्राचा हैदोस मध्ये मध्ये सुरूच असतो. राज्यप्रमुखाचे आपण खास आहोत, या अविर्भावात चालणारी ही गुंडगिरी पक्ष प्रतिमेला संजीवनी देणारी कशी ठरते?, या प्रश्नाचे उत्तर शोधण्याच्या भानगडीत सध्या पक्षनेते पडायला तयार नाहीत. खूप दिवसांनी मिळालेल्या सत्तेमुळे त्यांना या फालतू गोष्टींवर विचार करायला वेळच मिळत नाही म्हणे! सत्ता मिळाली की, कार्यकर्त्यांचे हात शिवशिवायला लागतात, बाहू फुरफुरायला लागतात, हा प्रकार तसा नेहमीचाच.
सर्वच राजकीय पक्षाला हा रोग जडलेला आहे. सत्तेत आले की, थोडेफार उन्मादाचे प्रकार होणारच, त्यात काय एवढे? असे म्हणत साऱ्याच राजकीय पक्षांनी या रोगाकडे आजवर दुर्लक्ष केले. त्यामुळे हा रोग सामान्य जनतेच्या सुद्धा अंगवळणी पडून गेला. असा रोग वारंवार डोके वर काढू लागला तर त्यातून प्रतिमाभंजन होते व त्याचा फटका नंतर निवडणुकीत बसतो, या वास्तवाकडेही सत्ताधारी कायम दुर्लक्ष करत असतात. त्यामुळे बाहू फुरफुरणाऱ्यांना उत्तेजन मिळण्यात मदतच होते. सध्या विदर्भात तेच सुरू
झाल्याचे या संगतवार घडणाऱ्या घटनांनी दाखवून दिले आहे. सगळ्याच पक्षात असलेल्या या रोगाची लागण आमच्याही पक्षाला झाली, त्यात काय मोठे?, हे चालायचेच, असे भाजपचे नेते समजत असतील तर मग इतरांपेक्षा वेगळे, ही घोषणा या पक्षाने थांबवलेलीच बरी! पक्षात सर्वच प्रकारचे लोक असतात आणि सत्ता आली की, गुंडगिरीला प्राधान्य देणारे हमखास जवळ चिकटतात, हे खरे असले तरी या घटनांमुळे सामान्य जनतेच्या होणाऱ्या अपेक्षाभंगाचे काय?, अरेरे, हेही तसेच निघाले, अशी प्रतिक्रिया देत जनतेने निवडणुकीचीच वाट प्रत्येक वेळी बघायची काय? याही प्रश्नांवर भाजपमध्ये कधी विचार होईल का?
देवेंद्र गावंडे – devendra.gawande@expressindia.com
आम्हीही नसू थोडके..
नागपुरात तर वर्षभरापासून ही गुंडगिरी अनेकदा अनुभवास आली आहे.
Written by देवेंद्र गावंडे
Updated:
First published on: 21-04-2016 at 01:30 IST
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp is not a party with a difference