बुलढाणा : राज्य सरकार आणि भाजप ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देणार आहे. त्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत असल्याची ग्वाही भाजप नेते आशीष देशमुख यांनी दिली. यावर बहुतेक पक्षांचे समान मत असल्याचे सांगतानाच मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी जरा संयमाने वक्तव्ये करावी, असा सल्लाही त्यांनी दिला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भाजपच्या ओबीसी जागर यात्रेचे आज, गुरुवारी सिंदखेडराजा येथे आगमन झाले. याप्रसंगी माध्यमाशी बोलताना त्यांनी तत्कालीन ठाकरे सरकारवर आरक्षणाच्या मुद्यावरून टीका केली. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला आरक्षण दिले होते. मात्र उद्धव ठाकरे, शरद पवार यांचे सरकार आल्यावर ते हे आरक्षण टिकवू शकले नाही. त्या सरकारने न्यायालयात आरक्षणची बाजू प्रभावीपणे मांडली नाही. त्यामुळे आरक्षण गमवावे लागले, असा आरोप देशमुख यांनी केला. मात्र, आता एकनाथ शिंदे यांचे सरकार मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देईल, असे त्यांनी सांगितले. मराठा-ओबीसी संघर्षाबद्दल विचारणा केली असता, विरोधी पक्ष यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करीत असल्याचा आरोप देशमुख यांनी केला. सरकार सामाजिक सलोखा राखण्यासाठी प्रयत्न करीत असून विरोधकांनी देखील सलोखा राखणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले.

हेही वाचा >>>एमपीएससी राज्यसेवा परीक्षेचा निकाल जाहीर, मागील पाच वर्षांतील ‘कट ऑफ’ आपल्याला माहिती आहे का?

पटोलेंना कार्यकर्ताही जुमानत नाही

काँग्रेसच्या नागपुरातील बैठकीत झालेल्या गोंधळाबद्दल विचारले असता, आशीष देशमुख यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची खिल्ली उडविली. नेते आणि हायकमांडने त्यांना आजपर्यंत गांभीर्याने घेतले नाही. आताशा सामान्य कार्यकर्तादेखील पटोले याना जुमानत नाहीये. त्यामुळे त्यांच्या बद्दल न बोललेले बरे, असे देशमुख म्हणाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp leader ashish deshmukh advises manoj jarange to speak with restraint scm 61 amy