बुलढाणा : स्वाभिमानाचे राजू शेट्टी आणि रविकांत तुपकर या दोन दिग्गज नेत्यांमधील वाद चिघळण्याचीच चिन्हे आहे. या पार्श्वभूमीवर एका नेत्याने तुपकरांना थेट भाजपामध्ये येण्याची खुली ‘ऑफर’ दिल्याने या संघर्षात नवा ‘ट्विस्ट ‘ निर्माण झाला आहे. याबद्धल विचारले असता तुपकरांनी विषयाला खुबीने बगल दिली.
स्वाभिमानीचे राज्यातील प्रमुख नेते असलेले तुपकरांनी अध्यक्ष शेट्टींवर निशाणा साधल्यावर संघटनेत खळबळ उडाली. यामुळे या दोघात राजकीय कलगीतुरा रंगला आहे. याचे पडसाद उमटले असून हा संघर्ष चिघळण्याची चिन्हे आहेत. या पार्श्वभूमीवर विदर्भातील भाजपाचे नेते तथा माजी आमदार आशिष देशमुख म्हणाले, की तुपकरांनी शेतकरी हितास्तव थेट भाजपामध्ये यावे. स्वाभिमानीमध्ये बहुजन समाजाच्या नेत्याचा स्वाभिमान दुखावला आहे. तुपकर हे अतिशय संघर्षातून वर आलेले शेतकरी नेते आहेत. विदर्भातील सोयाबिन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी त्यांनी केलेली आंदोलने आम्ही जवळून पाहिली आहे. त्यामुळे त्यांच्याबद्दल आम्हाला आस्था व प्रेम आहे. त्यांनी शेतकऱ्यांचे व्यापक हित लक्षात घेऊन त्यांनी भाजपामध्ये यावे अशी विनंतीवजा ऑफर आपण देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा – देशात तीन दशकांमध्ये १३७७ वाघांची शिकार! वाघांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर
यावर तूर्तास अधिक बोलणे योग्य नाही, असे सांगून तुपकर यांनी विस्तृत बोलण्याचे टाळले.
हेही वाचा – नागपूर : मेडिकलमध्ये वरिष्ठ डॉक्टरच्या विरोधात लैंगिक छळाची तक्रार
पडद्यामागे कोण?
देशमुख हे भाजपाचे राज्यातील शिर्षस्थ नेते देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे समजले जातात. त्यामुळे संघटनात्मक पद नसताना त्यांनी केलेली ऑफर वैयक्तिक आहे की यामागे कोणी बोलविता धनी आहे? यावरून आता चर्चा रंगली आहे.