वर्धा : ज्येष्ठ नेते व माजी खासदार दत्ता मेघे हे सदा घोळक्यात रमणारे व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात. तसेच भोजनावळी आयोजित करण्याची त्यांना भारी आवड. सावंगी येथील त्यांच्या बंगल्यात बुधवारी रात्री भोजन सोहळा पार पडला. निवडक भाजप नेत्यांसाठी असलेल्या या सोहळ्यात खासदार रामदास तडस,आमदार डॉ.पंकज भोयर,जिल्हाध्यक्ष सुनील गफात, माजी जिल्हाध्यक्ष डॉ.नारायण निकम,माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष वैशाली येरावार संघटन मंत्री अविनाश देव,प्रदेश सचिव राजेश बकाने, डॉ.उदय मेघे,नगर परिषदेचे माजी पदाधिकारी व अन्य सहभागी झाले होते.
या वेळी मन की बातचा शंभरावा भाग, सदस्य नोंदणी, आगामी निवडणुका व अन्य विषयावर हसत खेळत चर्चा झाल्याची माहिती मिळाली. मेघे आपल्या तब्येतीची या काळात जाणीव करून देत आता उरले काय,असा निश्र्वास सोडत असतात. त्यावेळी धीर देत खा.तडस यांनी एक शेर सादर केला.ते म्हणाले ‘ मैने खुदासे दुवा मांगी , दुआ में मैने मौत मांगी, खुदा ने कहा मैं तो तुझे मौत दे दूंगा, लेकीन तेरे लाखो चाहने वालो को क्या जवाब दू ,जिसने तेरे लंबी उमर की दुआ मांगी ‘ यावर मेघेंसह सर्वांनी खळाळून दाद दिली. बैठकीत काय शिजले याबाबत नेमकी माहिती पुढे आली नाही. मात्र, एका उपस्थिताने नमूद केले की उघड अशी काही चर्चा झाली नाही.खुद्द मेघे म्हणाले की गत तीन वर्षात कोविडमुळे लोकांना बोलविता आले नाही. म्हणून ही पंगत होती. पण हा भोजनबेत सहज नसल्याचे म्हटल्या जात आहे.