नागपूर: छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकर याला तेलंगणात पळून जाण्यास मदत करणाऱ्या प्रशिक पडवेकर याच्याबाबत काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी मुख्यमंत्री कार्यालयालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. यामुळे महसूलमंत्री व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे संतापले. ते म्हणाले, मुख्यमंत्री कार्यालयाबद्दल बोलण्याची काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांची उंची नाही.
छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज खासदार उदयनराजे भोसले यांनी देशाला स्वातंत्र मिळवून देण्यासह चांगले काम करणाऱ्या स्वातंत्रवीर व महान व्यक्तींबाबत अपशब्द बोलणाऱ्याविरुद्ध कायदा करण्याची केलेली मागणी योग्य आहे. त्यादृष्टीने सरकार निश्चितच काम करेल. मात्र लोंढे यांनी बालीशपणा करू नये. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविरूद्ध अपशब्द काढणाऱ्या कोरटकर याला कुणीही भाजपची व्यक्ती मदत करू शकत नाही. तसा विचारही करणे चुकीचे आहे. लोंढे यांनी मुख्यमंत्री कार्यालयाबद्दल बोलतांना स्वत:ची उंची तपासण्याची गरज आहे.
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनाही संघाबाबत अभ्यास करून बोलण्याची गरज आहे. संघावर बोलण्याची उंची नसतानाही ते काहीही बोलत असतात. संघ समजायला वडेट्टीवार यांना खूप वेळ लागेल. अद्यापही काँग्रेस पराभवाच्या मानसिकतेतून बाहेर आली नसून संघविरोधातील वक्तव्य त्यातूनच आलेले दिसत आहेत. काँग्रेसने नेहमीच जाती- धर्माच्या जोरावर सत्ता भोगली आहे. आता लोकांना हे कळल्याने त्यांची पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळेच विजय वड्टेटीवार काहीही बडबड करत असल्याचा टोला बावनकुळे यांनी लगावला.
अजित पवारांच्या वक्तव्यावर म्हणाले सरकारला तीनच महिने…
उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी शेतकऱ्यांना आता कर्जमाफी नाही, असे वक्तव्य केल्यावर नवीन वाद सुरू झाला आहे. त्यावर बावनकुळे म्हणाले, सरकारला येऊन आता केवळ तीन महिने झाले आहे. हे सरकार पूर्ण ५ वर्षे चालणार आहे. त्यामुळे भाजपने शेतकरी, राज्यातील बहिण, भावाला दिलेले सर्व वचन पूर्ण केले जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफीसह सगळेच आश्वासन पूर्ण होणार असल्याने कुणीही घाबरण्याचे कारण नसल्याचेही बावनकुळे यांनी सांगितले.
काँग्रेसला मोठे खिंडार…
नागपूरच्या देवलापार परिसरातील २२ सरपंच, १२५ ग्राम पंचायत सदस्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपुरात येणार असल्याच्या एक दिवसापूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाकडे आकर्षीत होऊन हा प्रवेश आहे, असेही चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले.