राज्यात दंगली सारख्या घटना होऊ नये यासाठी सर्व पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे. मात्र त्यासाठी महाविकास आघाडीने सर्वात आधी संजय राऊत नावाचा सकाळी नऊ वाजता वाजणारा भोंगा बंद करावा, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. चंद्रशेखर बावनकुळे प्रसार माध्यमांशी बोलत होते. संभाजीनगर मध्ये सध्या शांतता आहे. मात्र सकाळी वाजत असलेला संजय राऊत नावाचा भोंगा बंद केला पाहिजे. अन्यथा जनता तो भोंगा बंद करेल.
हेही वाचा >>> काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची गृहजिल्ह्यातील आंदोलनाकडे पाठ!
विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी घेतलेली भूमिका कौतुकास्पद आहे. अशीच भूमिका इतरही विरोधी पक्षाचे नेते घेतील अशी अपेक्षा आहे. पण दुर्दैवाने चंद्रकांत खैरे सारखे ठाकरे गटाचे नेते आगीत तेल ओतण्याची भूमिका घेत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संभाजी नगर येथील परिस्थितीवर लक्ष ठेवून असून लवकरच या घटनेतील सूत्राधार समोर येतील असेही बावनकुळे म्हणाले. लोकसभेच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीने उमेदवार द्यावा किंवा न द्यावा हा त्यांचा निर्णय आहे. आम्ही आमचा उमेदवार देऊन निवडणुकीला सामोरे जाऊ, असेही बावनकुळे म्हणाले.