नागपूर :  जाहीर प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सोमवारी रात्री प्रचार आटोपून परत येत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार ) ज्येष्ठ नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला झाला. या घडनेचे राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटले असून भाजप आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये आरोपप्रत्यारोप सुरू झाले आहेत. सत्ताधारी पक्ष विशेषतः भाजपने ही घटना म्हणजे स्टंटबाजी, बनावट, स्वत:च घडवून आणली आणि काँग्रेसच्या मध्य नागपुरातील उमेदवाराने हा प्रकार केल्याचा अजब दावा केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नरखेड येथून परत येताना रात्री ८ वाजच्या सुमारास काटोल जलालखेडा रोडवरील बेलफाट्याजवळ काही व्यक्तींनी त्यांच्या गाडीवर मोठ्या प्रमाणात दगडफेक करत जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात जखमी झालेल्या अनिल देशमुख यांच्यावर उपचार सुरू आहे. तर घडलेल्या प्रकरणावरुन संताप व्यक्त केला जात आहे. सत्ताधारी पक्षातील अनेक नेत्यांनी मात्र अनिल देशमुख आणि काँग्रेसच्या नेत्यांवर आरोप केले आहेत. भाजपचे विधान परिषद सदस्य परिणय फुके यांनी अनिल देशमुख यांच्यावरील हल्ला संशयास्पद असून त्यांनी स्वतःच स्वतावर हल्ला घडवून आणला असण्याची शक्यता आहे, असे सांगितले.

हेही वाचा >>>सत्ताधाऱ्यांच्या आशीर्वादातूनच देशमुखांवर हल्ला, पुत्र सलील यांचा गंभीर आरोप

ते पुढे म्हणाले, अनिल देशमुखांच्या गाडीच्या बोनेटवरसुद्धा दगड पडलेला दिसतो आहे, मात्र, त्यावर कुठेही निशान दिसत नाही. गाडीच्या काचांनीही मोठ्या भेगा दिसत आहेत. यासगळ्या गोष्टी संशयास्पद आहे. यासंदर्भातील तपास होणे आवश्यक आहे. ही घटना म्हणजे अनिल देशमुखांनी केलेले नाटक आहे. ते काटोलच्या जनतेला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करत आहेत. मागच्या २५ वर्षांपासून ते आमदार होते. मात्र, त्यांनी कोणतीही विकासकामे केलेली नाही. त्यांनी आता त्यांच्या मुलाला निवडणुकीत उतरवले आहे. तो जिंकून येऊन शकत नाही, हे लक्षात आल्याने अनिल देशमुख हे सगळे नाटक रचवून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोपही परिणय फुके यांनी केला आहे.

हेही वाचा >>>दिग्गज नेत्यांनी चंद्रपूरचे प्रचार मैदान गाजवले; ‘डॉली चायवाला’चा रोड शो

एवढेच नव्हेतर मध्य नागपूरचे काँग्रेसचे उमेदवार बंटी शेळके अशाप्रकारचे कृत्य करू शकतात, असा आरोपही केला. युवक काँग्रेसचे सरचिटणीस बंटी शेळके हे काँग्रेसचे मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आहेत. त्यांचा नागपूर ग्रामीण मधील काटोल मतदारसंघाशी काहीही संबंध नाही. शिवाय त्यांचे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि इतर सर्व पक्षांतील नेत्यांशी चांगेल संबंध आहेत. असे असताना परिणय फुके यांनी अनिल देशमुखांवर आरोप करताना बंटी शेळके यांनाही गोवण्याचा प्रयत्न केला. त्यावर बंटी शेळके यांनी परिणय फुके हेच अनिल देशमुख यांच्यावरील हल्ल्याचे सूत्रधार असल्याचा पलटवार केला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp leader claims that congress candidate attacked anil deshmukh rbt 74 amy