लोकसत्‍ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अमरावती : विधानसभा निवडणुकीला अवघा आठवडाभराचा अवधी शिल्‍लक असताना प्रचार शिगेला पोहचला आहे. राजकीय नेते एकमेकांवर आरोप-प्रत्‍यारोप करताहेत. अनेक ठिकाणी बंडखोरांनी राजकीय पक्षाच्‍या उमेदवारांची चिंता वाढवली आहे. अशातच आता अमरावतीत भाजपच्‍या नेत्‍या माजी खासदार नवनीत राणा यांच्‍या प्रचार वाहनाची चर्चा रंगली आहे.

नवनीत राणांच्या प्रचार वाहनावरील ध्वनिक्षेपकाद्वारे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नवनीत राणा यांचे संदेश प्रसारीत केले जात आहेत. नवनीत राणा यांच्या पराभवानंतर राजकमल चौकात जे काही झाले ते पाहून वेड्यांनो आता जागे झाले नाही, तर तुम्हाला रस्त्यावर फिरता येणार नाही, असे देवेंद्र फडणवीस यांचे वक्तव्य ध्वनिक्षेपाद्वारे सातत्याने ऐकवले जात आहे. यासोबतच नवनीत राणा यांनी आपल्या पराभवासंदर्भात केलेले भावनिक आवाहनही चर्चेचा विषय बनले आहे.

आणखी वाचा-पवार काका पुतण्यांनी दिलेल्या उमेदवारांमुळे तेली समाजात फूट पडण्याची भीती

अमरावती मतदारसंघात फिरत असलेल्‍या या प्रचार वाहनातून नेमका कुणाला संदेश दिला जात आहे, याची चर्चा मतदारांमध्‍ये सुरू झाली आहे. प्रचार वाहनावरील फलकावर ज्‍यांनी मला व जिल्‍ह्याच्‍या विकासाला थांबविले, त्‍या नेत्‍यांचे हिशेब करा, असा उल्‍लेख आहे. त्‍यांचा रोख कोणत्‍या नेत्‍यांकडे आहे, यावर तर्क-वितर्क केले जात आहेत. प्रचाराचे हे वाहन सर्वाधिक विदर्भ ज्ञान विज्ञान महाविद्यालय, शेगाव नाका परिसर, राठी नगर गाडगे नगर, राधानगर आणि काही झोपडपट्टयांच्‍या परिसरात सातत्याने फिरत आहे. त्‍यातून संदेश ऐकविले जात आहेत.

नवनीत राणा या महायुतीच्‍या उमेदवारांचा प्रचार करीत असल्‍या, तरी अमरावतीत मात्र त्‍या राष्‍ट्रवादी काँग्रेसच्‍या (अजित पवार) उमेदवार सुलभा खोडके यांच्‍यासाठी समोर आलेल्‍या नाहीत. त्‍यामुळे नवनीत राणा यांना अशा प्रचाराची गरज का भासली, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

आणखी वाचा-भाजप आमदारांच्या प्रतिमेला चपलांचा हार, झेंडेपार लोह खाणीचा मुद्दा तापला

नवनीत राणा यांच्या प्रचाराच्‍या वाहनातून खोडके यांच्याविरोधात अप्रत्यक्षपणे संदेश देण्यात असल्याची चर्चा अर्थहीन असल्‍याचे भाजपा प्रदेश प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी म्‍हटले आहे. यासंदर्भात त्‍यांना पत्रकार परिषदेत विचारणा करण्‍यात आली, तेव्‍हा ते म्हणाले, नवनीत राणा यांच्या प्रचार वाहनांवर खोडके यांना पाडा, महायुतीला पाडा असा उल्लेख केला असेल तर तो निश्चितच आक्षेपार्ह असता. लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांना काँग्रेसच्या बळवंत वानखडे यांनी पराभूत केले होते. त्यामुळे नवनीत राणा यांचा प्रचार योग्य दिशेने आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp leader former mp navneet ranas campaign vehicle get viral in amravati mma 73 mrj