अकोला : अकोला जिल्ह्यातून तब्बल १५ हजार ८४५ बांगलादेशी रोहिंग्या मुस्लिमांना जन्म प्रमाणपत्र देण्याचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.या प्रकरणात त्यांनी आज रामदास पेठ पोलीस ठाण्यात पुरावे दाखल करून बयाण नोंदवले. माहिती अधिकारात प्राप्त केलेले काही कागदपत्रे त्यांनी पोलिसांकडे सादर केली आहेत. या प्रकरणी रामदास पेठ पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल असून त्यामध्ये तीन आरोपींना अटक केली आहे.

बांगलादेशी रोहिंग्या मुस्लिमांविरोधात भाजप नेते तथा माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आक्रमक पवित्रा घेतला. किरीट सोमय्या यांनी अकोला जिल्ह्यातही बनावट जन्म प्रमाणपत्र देण्यात आल्याचा आरोप केला आहे. जिल्ह्यातून जन्म प्रमाणपत्रांचा तपशिल महसूल व वन विभागाने मागवला होता. जन्म, मृत्यू नोंदणी कायदा १९६९ मध्ये सुधारणा करून उशिरा जन्म व मृत्यू नोंदणी संबंधीचे अधिकार हे जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी यांना प्रदान करण्यात आले आहेत. उशिरा जन्म – मृत्यू नोंदणीमध्ये जिल्ह्यात १५ हजार ८४५ अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी १० हजार २७३ प्रमाणपत्र देण्यात आले असून, १०७ नामंजूर व चार हजार ८४४ प्रलंबित आहे.

कायद्यातील सुधारणेनंतर झालेल्या कार्यवाहीसंदर्भात शासनाला मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे आता उशिरा जन्म-मृत्यू नोंदणी प्रमाणपत्र प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली आहे. २०२३ पासून दिलेल्या प्रमाणपत्र प्रकरणी प्राप्त तक्रारींची चौकशी गृह विभागामार्फत विशेष तपासणी पथकाद्वारे केली जात आहे.दरम्यान, या प्रकरणात रामदास पेठ पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे. त्या गुन्ह्यामध्ये पोलिसांनी कारवाई करून तीन आरोपींना अटक केली आहे.

आज सोमय्या यांनी आणखी काही लोकांची यादी पोलिसांकडे दिली. तहसीदारांनी नियमबाह्य पद्धतीने जन्माचे दाखले दिले आहेत, असा आरोप सोमय्या यांनी केला. किरीट सोमय्या यांनी आज मूर्तिजापूर येथे देखील भेट देऊन प्रकरणाची माहिती घेतली. या प्रकरणी कारवाईला वेग आला असून जन्म प्रमाणपत्र देणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार आहे.

जन्म प्रमाणपत्र प्रकरणात किरीट सोमय्या यांनी आज रामदास पेठ पोलीस ठाण्यात बयाण नोंदवले. त्यांनी काही कागदपत्रे देखील सादर केली आहे. या प्रकरणात एक गुन्हा दाखल असून त्यात तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. सतीश कुळकर्णी, शहर उपविभागीय पोलीस अधिकारी, अकोला.

Story img Loader