अमरावती: भाजपच्या नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा यांनी सोमवारी हाती तलवार घेऊन पाकिस्तानच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. नवनीत राणा म्हणाल्या, “हिंदुस्थानवर डोळे वटाराल, तर डोळेच काढून हाती देऊ.” नवनीत राणा यांनी तलवार म्यानातून बाहेर काढून पाकिस्तानला इशारा दिला. यावेळी त्यांनी हिंदुस्थान जिंदाबादच्या घोषणाही दिल्या.

आमदार रवी राणा यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सोमवारी येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक सभागृहात पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यात मृत्युमूखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. पुष्पहार, पुष्पगुच्छ न स्वीकारता साधेपणाने वाढदिवस साजरा करण्याचे आवाहन रवी राणा यांनी युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांना केले होते. यावेळी नवनीत राणा यांनी तलवार उंचावून पाकिस्तानच्या विरोधात घोषणाबाजी केली.

रविवारी एका कार्यक्रमात नवनीत राणा यांनी पाकिस्तानच्या नेत्यांवर टीका करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे कौतुक केले. पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष बिलावल भुट्टो झरदारी यांनी भारतावर आरोप केले होते, त्यावर नवनीत राणा म्हणाल्या, पंतप्रधान मोदी हे भुट्टोसारख्याला भुट्ट्यासारखे भाजतील. मला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यावर विश्वास आहे. ‘आयपीएल’चा जेवढा खर्च आहे तेवढा पाकिस्तानचा ‘जीडीपी’ आहे. अख्ख्या पाकिस्तानात ताकद नाही भारताकडे वाकड्या नजरेने बघायची. भारतात एक वाघ राहतो. त्याचे नाव नरेंद्र मोदी आहे. पाणीच काय, तुमचे दाना पण बंद करू.

..तर माझा मुलगा गोळ्या झेलेन असे म्हणतो

नवनीत राणा म्हणाल्या, माझा लहान मुलगा आहे. त्याला विचारले की कुराण वाचणार का? तर, तो म्हणतो मी कट्टर हिंदुत्ववादी आहे. गोळी खाणार पण कुराण वाचणार नाही, आपला लहान मुलगा काय बोलतो, हे सांगताना नवनीत राणा यांनी पुन्हा एकदा मी कट्टर हिंदुत्ववादी असल्याचे सांगितले. पहलगाममध्ये कुराण वाचायला सांगितले, पण आमच्या बहिणींना वाचता आले नाही. तेव्हा दहशतवाद्यांकडून हिंदूंवर गोळ्या झाडल्या गेल्या. हिंदू भावांनी गोळ्या झेलल्या पण कुराण वाचायला ते तयार झाले नाही.

हिंदू म्हणून एकत्र येणे गरजेचे

नवनीत राणा म्हणाल्या की, दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये जात विचारुन मारले नाही. त्यांनी एकच प्रश्न केला तुम्ही हिंदू आहात का, मुस्लिमांना बाजूला होण्यासाठी सांगितले आणि हिंदूंवर गोळीबार केला. आत जात-पात सोडून हिंदू म्हणून एकत्र येणे गरजेचे आहे.