नागपूर : ‘माझ्या दोन्ही मुलांवर बाला यादवच्या मुलाने हल्ला केल्याची माहिती मिळाल्यानंतर मी धंतोली पोलीस ठाण्यात पोहचलो. तेथे मुलगा करण हा रक्तबंबाळ दिसला.  पोलीस हवालदार सुभाष याने मला शिवीगाळ केल्यामुळे मीसुद्धा चिडून शिवीगाळ केली, असे  भाजपचे वादग्रस्त नेते मुन्ना यादव यांने पत्रपरिषदेत सांगितले नुकताच धंतोली पोलिसांनी मुन्ना यादव आणि त्याची मुले करण आणि अर्जूनवर पोलिसांना मारहाण करणे, शिवीगाळ करणे, धमकी दिल्याप्रकरण गुन्हा दाखल केला आहे.  

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुन्ना यादव म्हणाले, शनिवारी रात्री दहा वाजता करण आणि अर्जून हे दोघेही घरात बसलेले होते. यादरम्यान, बाला यादवच्या मुलांसोबत वस्तीतील एका युवकाचा वाद झाला. त्याला मारण्यासाठी बाला यादवची मुले पाठलाग करीत होते. तो युवक माझ्या घरात शिरला. त्यांना विरोध करण्यासाठी करण-अर्जून मध्ये पडले. त्यामुळे चिडलेल्या बाला यादवच्या मुलांनी दोघांवरही तलवारीने हल्ला केला. त्यामुळे करणच्या डोक्यावर २७ टाके पडले तर अर्जूनचा हात मोडला. हे प्रकरण धंतोली पोलीस ठाण्यात गेले. मी पोलीस ठाण्यात पोहचलो. मुलगा करण हा रक्तबंबाळ दिसला. त्याला पोलिसांनी पोलीस ठाण्याचा बाहेर उभे राहण्यास सांगितले. ‘पोलीस ठाणे तुझ्या बापाचे आहे का?’ असा प्रश्न विचारला. पोलीस हवालदार सुभाष वासाडे याला मी समजून सांगितले की, मुलगा रक्तबंबाळ आहे, त्याला रुग्णालयात घेऊन चला. त्यावर हवालदाराने मला शिवीगाळ केली. त्यामुळे मीसुद्धा चिडलो आणि पोलिसांना शिवीगाळ केली, अशी कबुलीच  पत्रकार परिषदेत मुन्ना यादव यांनी दिली.

हेही वाचा >>>“राजकुमार पटेलांना बच्‍चू कडूंनीच शिवसेनेत पाठवले,” रवी राणांचा गौप्‍यस्‍फोट

मी पोलिसांना मारहाण केली नाही

रागाच्या भरात मी शिवीगाळ केली असली तरी मी पोलिसांवर हात उगारला नाही. तसेच मी पोलिसांना मारहाण केली नाही. गंभीर जखमी मुलावर उपचारास उशिर होत असल्यामुळे मी चिडलो पण मारहाण केल्याचा आरोप खोटा आहे. माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मी पोलिसांविरुद्ध गृहमंत्र्यांकडे तक्रार केली आहे. त्यावर लवकरच कारवाई होणार आहे, असेही मुन्ना यादव म्हणाले.

हेही वाचा >>>नाटयमय घडामोडीनंतर रितिका मालू पोलीस कोठडीत…सीआयडीने थेट कारागृहात पोहोचून…

राजकीय हस्तक्षेप नाही

धंतोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊ नये म्हणून राजकीय दबाव होता. राजकीय हस्तक्षेप केल्याची अफवा आहे. मला  कोणतीही मदत केली नाही. मदत केली असती तर माझ्यावर शासकीय कामकाजात अडथळा आणल्याचा गुन्हाच दाखल झाला नसता. त्यामुळे या प्रकरणात कोणाचे नाव उगाच कुणीही घेऊ नये. असे यादव म्हणाले

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp leader munna yadav explained about the abuse of the police nagpur news adk 83 amy