अमरावती : समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी औरंगजेब क्रूर प्रशासक नव्हता, असे म्हटले आहे. त्यांच्या या विधानावर अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. अशातच आता भाजपच्‍या नेत्‍या आणि माजी खासदार नवनीत राणा यांनी अबू आझमींच्या या वक्तव्याबद्दल संतप्त व्हिडिओ शेअर केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अबू आझमी म्हणाले होते की, ‘चुकीचा इतिहास दाखवला जात आहे. औरंगजेबाने अनेक मंदिर बनवलेली आहेत. मी औरंगजेबाला क्रूर प्रशासक मानत नाही. तसेच छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यातील जी लढाई होती, ती राज्य कारभाराची होती आणि हिंदू-मुस्लिम अशी नव्हती. मी असे मानतो की, औरंगजेबाच्या काळात भारताची सीमा अफगाणिस्तानपर्यंत होती. त्या काळात आपला जीडीपी २४ टक्के एवढा होता. तेव्हा भारताला सोने की चिड़िया म्हटले जायचे. मग मी याला चुकीचे म्हणू का? तसेच छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेबाची लढाई ही धर्माची होती असे मी मानत नाही.’ त्यांच्या या विधानानंतर अनेकांनी टीकेची झोड उठवली आहे.

अबू आझमींच्या या विधानावर नवनीत राणा यांनी व्हिडिओ शेअर केला आहे. नवनीत राणा म्‍हणाल्‍या की, ज्‍या पद्धतीने अबू आझमींनी हे वक्‍तव्‍य केले आहे, त्‍यांनी एकदा जाऊन छावा चित्रपट पाहून घ्‍यावा. या चित्रपटामध्‍ये जो इतिहास दाखवला आहे आणि आजवर जे आम्‍ही वाचलेले आहे, त्‍यात छत्रपती संभाजी महाराजांवर अत्‍याचार करणारा हा औरंगजेब हा क्रूर राजा होता, संभाजी महाराजांच्‍या डोळ्यात सळई टाकणारा औरंगजेब होता, हे सर्वांना माहित आहे. ज्‍या प्रकारे महाराष्‍ट्र सरकारने औरंगाबादचे नाव बदलून छत्रपती संभाजी नगर केले, त्‍या सरकारने आता औरंगजेबला बाप म्‍हणणाऱ्या लोकांना सडेतोड उत्‍तर दिले पाहिजे. महाराष्‍ट्रात आता हिंदुत्‍ववादी विचारांचे सरकार आहे. ज्‍या व्‍यक्‍तीने छत्रपती संभाजी महाराजांवर भयंकर अत्‍याचार केले, त्‍या औरंगजेबाची कबर खुलताबाद येथून उखडून फेकून दिली पाहिजे, अशी विनंती आपण सरकारला करणार आहोत.

नवनीत राणा म्‍हणाल्‍या, जो हिंदू हिताची गोष्‍ट करणार नाही, त्‍यांना या देशात राहण्‍याचा अधिकार नाही. महायुतीचे सरकार औरंगजेबाची कबर उखडून फेकणार तर आहेच, पण ज्‍यांना औरंगजेबावर प्रेम आहे, त्‍यांनी आपल्‍या घरी ती कबर न्‍यावी, अशा शब्‍दात नवनीत राणा यांनी संताप व्‍यक्‍त केला आहे.