अमरावती : भाजपच्‍या स्‍टार प्रचारक नेत्‍या नवनीत राणा यांनी दर्यापूर मतदारसंघात महायुतीच्‍या विरोधात उघड प्रचार सुरू केल्‍याने वातावरण तापले आहे. महायुतीतील शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे उमेदवार अभिजीत अडसूळ यांच्‍या विरोधात निवडणूक रिंगणात असलेले युवा स्‍वाभिमान पक्षाचे रमेश बुंदिले यांच्‍यासाठी गेल्‍या तीन दिवसांपासून नवनीत राणा या पदयात्रा, सभा घेत आहेत. रमेश बुंदिले यांचे निवडणूक चिन्‍ह पाना आहे. “कमळच पाना आहे”, असा संदेश देत मतदारांना त्‍या आवाहन करू लागल्‍याने अडसूळ पिता-पुत्र आणि राणा दाम्‍पत्‍यातील वाद आणखी पेटण्‍याची शक्‍यता वर्तविण्‍यात येत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गेल्‍या तीन दिवसांपासून नवनीत राणा यांनी दर्यापूर मतदारसंघात प्रचाराचा धडाका लावला आहे. शुक्रवारी त्‍यांनी पांढरी, दहीगाव, लखाड, निमखेड बाजार, चौसाळा, सातेगाव, मु-हादेवी, कोकर्डा, असदपूर अशा गावांमध्‍ये पदयात्रा करून मतदारांना युवा स्‍वाभिमान पक्षाचे उमेदवार रमेश बुंदिले यांना मतदान करण्‍याचे आवाहन केले.

हेही वाचा…“आजवर काय केले तेही सांगत नाही अन् पुढे काय करणार ते पण बोलत नाही,” चर्चेतील टीका

पदयात्रेदरम्‍यान, भाजपचा दुपट्टा घातलेले काही कार्यकर्ते आणि सोबतच युवा स्‍वाभिमान पक्षाचा दुपट्टा घातलेले कार्यकर्ते दिसून येत आहेत. रमेश बुंदिले यांचा पाना हे चिन्‍ह म्‍हणजेच कमळ आहे, असे मतदारांना सांगत नवनीत राणा या शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाच्‍या उमेदवाराला विरोध करताना दिसत आहेत. त्‍यांच्‍या या प्रचारशैलीची चर्चा जिल्‍ह्यातील राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

हेही वाचा…यवतमाळ: कुटुंब रमले प्रचारात…कुणी पहिल्यांदा ओलांडला बंगल्याचा उंबरठा, कुणी धूळभरल्या वाटेवर….

महायुतीतील घटक पक्षाच्‍या उमेदवाराच्‍या विरोधात उघडपणे प्रचार करण्‍याच्‍या नवनीत राणा यांच्‍या भूमिकेवर माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी स्‍पष्‍ट शब्‍दात नाराजी व्‍यक्‍त केली आहे. राणा दाम्‍पत्‍याला मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्‍यमंत्री अजित पवार यांनी समज दिली, पण ते ऐकण्‍यास तयार नाहीत. महायुती धर्माचे पालन ते करीत नाहीत. याबद्दल नवनीत राणा यांच्‍यावर भाजपने कारवाई करायला हवी, पण आम्‍ही आता तो विषय सोडून दिला आहे. आमच्‍या उंचीविषयी खालच्‍या पातळीवर टिप्‍पणी करणे, खोटे आरोप करणे यातून त्‍यांनी खलनायकी प्रवृत्‍ती दाखवून दिली आहे, असे अडसूळ सांगतात. नवनीत राणा या त्‍यांचे पती रवी राणा यांच्‍या मतदारसंघात प्रचाराला जात नाहीत. पण, त्‍यांच्‍या दर्यापुरात मात्र महायुतीच्‍या विरोधात प्रचार करतात, हा विचित्र प्रकार असल्‍याचे अडसूळ म्‍हणतात. आमच्‍यासोबत भाजपचे ९८ टक्‍के पदाधिकारी आणि कार्यकर्ते आहेत, असा दावा त्‍यांनी केला आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp leader navneet rana launched open campaign against mahayuti in daryapur heating up atmosphere mma 73 sud 02