अमरावती : समाजवादी पार्टीचे नेते व मानखुर्द-शिवाजीनगरचे आमदार अबू आझमी यांनी मुघल शासक औरंगजेबाच्या बाबत केलेल्या एका वक्तव्यानंतर त्यांना निलंबित करण्यात आले आहे. अधिवेशन संपेपर्यंत अबू आझमी हे निलंबित आमदार असणार आहेत. अबू आझमी यांनी औरंगजेब क्रूर प्रशासक नव्हता, असे म्हटले होते. त्यांच्या या विधानावर अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या होत्या. या दरम्‍यान भाजपच्‍या नेत्‍या आणि माजी खासदार नवनीत राणा यांनी अबू आझमी यांच्यावरील कारवाईचे स्वागत केले आहे.

नवनीत राणा म्हणाल्या, अबू आझमी यांनी मुघल शासक औरंगजेबाच्या बाबतीत केलेल्या वक्तव्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने आज ज्या पद्धतीने कारवाई केली, त्याचा आनंद आहे. औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता, त्याने चांगल्या पद्धतीने राज्य चालविले, असे अबू आझमी म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्याच्या विरोधात देवेंद्र फडणवीस सरकारने त्यांना निलंबित केले आहे. आमच्या या सरकाला अजून एक विनंती आहे, ज्या पद्धतीने औरंगजेबाचे विचार आमच्या महाराष्ट्राला मान्य नाहीत, त्याच पद्धतीने खुलताबाद येथे औरंगजेबाची जी कबर आहे, ती लवकरात लवकर उखडून महाराष्ट्राच्या बाहेर फेकली पाहिजे.

जे औरंगजेबाचा गुणगौरव करतात, ते औरंगजेबाला बाप मानतात, ज्यांना औरंगजेब याच्यावर प्रेम आहे, त्यांना असाच धडा शिकवला पाहिजे. या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार चालतात, औरंगजेबाचे नाहीत, हे सर्वांनी जाणून घ्‍यावे.

अबू आझमी काय म्हणाले होते?

अबू आझमी म्हणाले होते की, ‘चुकीचा इतिहास दाखवला जात आहे. औरंगजेबाने अनेक मंदिर बनवलेली आहेत. मी औरंगजेबाला क्रूर प्रशासक मानत नाही. तसेच छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यातील जी लढाई होती, ती राज्य कारभाराची होती आणि हिंदू-मुस्लिम अशी नव्हती.

मी असे मानतो की, औरंगजेबाच्या काळात भारताची सीमा अफगाणिस्तानपर्यंत होती. त्या काळात आपला जीडीपी २४ टक्के एवढा होता. तेव्हा भारताला सोने की चिड़िया म्हटले जायचे. मग मी याला चुकीचे म्हणू का? तसेच छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेबाची लढाई ही धर्माची होती असे मी मानत नाही.’ त्यांच्या या विधानानंतर अनेकांनी टीकेची झोड उठवली होती. च‍हूबाजूंनी होत असलेल्‍या टीकेनंतर आझमी यांनी आपले वक्‍तव्‍य मागे घेतले होते. दरम्‍यान त्‍यांना आज विधानसभेतून अधिवेशन काळासाठी निलंबित करण्‍यात आले.

Story img Loader