बडनेरा मतदार संघातील भाजपच्या माजी नगरसेवकांनी मंजूर केलेली कामे सध्या मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. या मतदार संघात भाजपच्या नगरसेवकांची संख्या जास्त असल्याने भाजपला याचे श्रेय मिळेल, या भीतीपोटी आमदार रवी राणा यांनी त्या ठिकाणी फलके लावण्याचा मुर्खपणा सुरू केला आहे. याचा विरोध करणे आवश्यक आहे. आपल्या प्रभागातही हाच प्रकार सुरू असल्याने तातडीने हे फलक काढावेत, असा इशारा भाजपचे महापालिकेतील माजी सभागृह नेते तुषार भारतीय यांनी रवी राणांना दिला आहे.
रवी राणा हे शिंदे-फडणवीस सरकारचे समर्थक आहेत. राणा दाम्पत्याने भाजपला पाठिंबा दिला आहे, या पार्श्वभूमिवर भाजपच्याच माजी नगरसेवकांने राणांच्या विरोधात दंड थोपटल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. तुषार भारतीय यांनी रवी राणांना खुले पत्र लिहिले असून त्यात त्यांच्यावर खरमरीत टीका केली आहे. रवी राणा हे त्यांच्या निधीतून होणाऱ्या कामांचे फलक लावण्याची कुठलीही संधी सोडत नाहीत. पण, भाजपच्या नगरसेवकांनी मंजूर केलेली कामे आता पूर्णत्वास जात आहेत, त्या ठिकाणी रवी राणा यांनी स्वत:च्या नावाचे फलक लावण्याचा घाणेरडा प्रकार सुरू केला. साईनगर प्रभात आपण तसेच माजी महापौर चेतन गावंडे, रेखा भुतडा यांनी मंजूर केलेल्या कामांवर रवी राणांनी स्वत:चे फलक लावून मर्दूमकी सिद्ध करण्याचा प्रयत्न चालवला आहे. याआधीही रवी राणांनी आपण मंजूर करून आणलेल्या कामांचे श्रेय घेण्याची केवीलवाणी धडपड केली आहे. बडनेरा मतदार संघातील जनतेला रवी राणा हे लोकप्रतिनिधी असल्याची लाज वाटत आहे, अशा शब्दात तुषार भारतीय यांनी रवी राणांवर टीका केली आहे.
हेही वाचा >>>नागपूर: धवनकरांनी प्राध्यापकांना पैसे मागितल्याची ध्वनिफीत ‘लोकसत्ता’च्या हाती
केंद्रात आणि राज्यात भाजपला पाठिंबा देणे आणि शहरात मात्र भाजपच्या नेत्यांना कार्यकर्त्यांना शिव्या देणे, त्यांचा अपमान करणे, नगरसेवकांनी केलेल्या कामांचे फुकट श्रेय घेणे हा प्रकार भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये चीड निर्माण करणारा आहे. पण, भाजपच्या कार्यकर्त्यांची पक्षनिष्ठा ही कमजोरी नाही, तर त्यांची जमेची बाजू आहे. त्यांना गृहित धरू नका, वेळीच शहाणे व्हा, असा इशारा देखील तुषार भारतीय यांनी रवी राणांना दिला आहे.
हेही वाचा >>>नागपूर: ‘समृद्धी’वर वेगमर्यादा ओलांडणाऱ्या वाहनांना अडवले! प्रथमच स्वयंचलित यंत्रणेतून कारवाई
रवी राणा यांनी ज्या ठिकाणी नामफलक लावून तीन-चार वर्षे झाली, ती कामे पूर्ण करावीत, त्यासाठी निधी खेचून आणावा. दुसऱ्यांच्या कामांचे श्रेय घेऊ नये. अन्यथा जनता तुम्हाला जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, असेही तुषार भारतीय यांनी खुल्या पत्रात म्हटले आहे.