लोकसत्ता टीम
अकोला : अकोला लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणी दरम्यान भाजप नेते विजय अग्रवाल यांना मंगळवारी दुपारी अस्वस्थ वाटू लागले. तात्काळ त्यांना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
अकोला लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी शिवणी येथील गोदामात सुरू आहे. या मतमोजणी दरम्यान टपाल मतपत्रिका मोजणी कक्षामध्ये उमेदवार प्रतिनिधी म्हणून उपस्थित असलेले भाजप नेते, माजी महापौर विजय अग्रवाल यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यांना चक्कर येत होती. त्यामुळे काही काळ गोंधळ निर्माण झाला होता. मतमोजणी प्रक्रियेदरम्यान उपस्थित असलेल्या वैद्यकीय पथकाने त्यांची तपासणी केली.
आणखी वाचा-नागपूर : ‘नोटा’ला २३ उमेदवारांपेक्षा मिळाली अधिक मते…
रुग्णवाहिकेतून त्यांना रुग्णालयात हलविण्यात आले आहे. मधुमेहाचा त्रास असल्याने त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याची प्राथमिक माहिती आहे. या सर्व घडामोडीदरम्यान मतमोजणी प्रक्रिया देखील थांबली होती. काही वेळातच मतमोजणी प्रक्रिया पूर्ववत झाली.