नागपूर : एकनाथ शिंदे यांनी पुन्हा मुख्यमंत्री व्हावे म्हणून त्यांचे गृहशहर ठाण्यात महिलांनी महाआरती केली. काही ठिकाणी समर्थकांनी यज्ञही केले. मात्र, या पदाचे प्रबळ दावेदार समजले जाणारे देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नागपूरमध्ये असे काहीही झाले नाही. मात्र, फडणवीसच मुख्यमंत्री होतील, असा विश्वास भाजप नेते व नागपूकरांनाही असल्याचे त्यांच्या प्रतिक्रियांमधून स्पष्ट होते.
विधानसभा निवडणुकीत तब्बल १३२ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आलेल्या भारतीय जनता पक्षाचे नेते व विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुन्हा मुख्यमंत्री होतील, अशीच चर्चा नागपूरपासून मुंबईपर्यंत सर्वत्र सुरू आहे. नागपूरकर नागरिकांनाही हेच वाटत आहे. पण, त्याबाबत जाहीर वाच्यता कोणी करीत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात मात्र वेगळे चित्र आहे. तेथे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री व्हावे म्हणून सोमवारी महाआरती केली. महिलांच्या हाती शिंदे यांचे फलक होते. माध्यमांमध्येही ते झळकले. त्यामुळे चर्चा सुरू झाली. मात्र, या पदाचे सर्वाधिक प्रबळ दावेदार समजले जाणारे फडणवीस यांच्या गृहशहरात कार्यकर्त्यांनी संयम बाळगलेला दिसून येत आहे. धरमपेठमध्ये लावलेल्या ‘देवाभाऊच मुख्यमंत्री’ या फलकाचा अपवाद सोडला तर फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदासाठी कार्यकर्त्यांनी ठाण्याप्रमाणे महाआरती किंवा तत्सम प्रकाराचे दर्शन घडवलेले नाही.
हेही वाचा…चंद्रपूर : आठ महिन्यांच्या वाघाचा मृतदेह आढळल्याने खळबळ
यासंदर्भात भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधला असता त्यांनी फडणवीसच मुख्यमंत्री होणार, असा विश्वास व्यक्त केला. ही सर्वसामान्य नागपूरकरांची इच्छा आहे, त्याचे सार्वजनिक प्रदर्शन करण्याची गरज काय, असा सवालही काहींनी केला. नागपूरसह संपूर्ण राज्यातील भाजपच्या यशाचे श्रेय फडणवीस यांनाच आहे. त्यांच्याच नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवण्यात आली होती. त्यामुळे त्यांचाच मुख्यमंत्रीपदासाठी पक्ष विचार करणार, यावर विश्वास असल्याचे नाव प्रकाशित न करण्याच्या अटीवर काही कार्यकर्त्यांनी सांगितले. भाजपचे नागपुरातील नवनिर्वाचित आमदार मुंबईकडे रवाना झाले आहेत. यापैकी एक लाखांहून अधिक मतांनी विजयी झालेले पूर्व नागपूरचे विद्यमान आमदार कृष्णा खोपडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनीही वरील प्रतिक्रिया दिली.
हेही वाचा…बुलढाणा : खळबळजनक! राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षांवर प्राणघातक हल्ला
नागपूरमधील सर्व कार्यकर्ते, पक्षाचे सर्व पदाधिकारी, निवडून आलेले आमदार या सर्वांची इच्छा फडणवीस हेच मुख्यमंत्री व्हावे अशी आहे. आम्ही ही इच्छा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कानावर घातली आहे. आमच्या इच्छेचा पक्ष अनादर करणार नाही, याची खात्री आहे. – कृष्णा खोपडे, भाजप आमदार, पूर्व नागपूर.