चंद्रपूर : मंत्री, पालकमंत्री, खासदार, आमदार या लोकप्रतिनिधींकडून होणारी उद्घटन, भूमिपुजन व लोकार्पण आता भाजपचे पदाधिकारी करायला लागले आहेत. घुग्घूस येथे भाजपच्या स्थानिक नेत्यांनी कामाशी संबंध नसतानाही गुपचूप भूमिपूजन, उदघाटन आटोपल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. काँग्रेसने याबाबत जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्याकडे तक्रार करून भाजप नेत्यांनावर कारवाईची मागणी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शासकीय निधीतून मंजूर झालेल्या अथवा निर्माण होत असलेल्या विकासकामांचे भूमिपूजन,उदघाटन,लोकार्पण हे शासकीय कार्य आहे. त्यामुळे त्या क्षेत्रातील पालकमंत्री, मंत्री, आमदार, खासदार किंवा शासकीय अधिकाऱ्यांच्या हस्तेच भूमिपूजन अथवा लोकार्पण होणे आवश्यक आहे. परंतु आता स्थानिक नेते नियमांची पायमल्ली करून स्वत:च भूमिपूजन, लोकापर्ण करीत आहेत. घुग्घूस शहरात भारतीय जनता पक्षाचे नेते राजुरा विधानसभा क्षेत्राचे प्रभारी तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे व भाजप शहर अध्यक्ष विवेक बोढे यांनी, विकासकामांचे राजकीय श्रेय घेण्यासाठी काहीही संबंध नसताना शासकीय अधिकारी व ठेकेदाराशिवाय शहरातील सि.एन.आय चर्च हायमस्ट लाईटचे लोकार्पण, साईनगर येथील बगीच्यांचे सरंक्षक भिंत व स्टेज, बहिरम बाबा नगर येथील बगीच्यांचे भिंतीचे भूमिपूजन काल रविवारी उरकून घेतले आहे.

हेही वाचा >>> अजित पवारांची खेळी? मुख्यमंत्र्यांच्या खात्यालाच निधी नाही; अडीच हजार वसतिगृह अनुदानाविना

यापूर्वी ही शहरातील अनेक हायमस्ट लाईट व रस्ते,नाली अन्य विकासकामांचे भूमिपूजन गुपचुप भाजप नेत्यांनी आटोपले आहे. दुसऱ्या लोकप्रतिनिधींच्या अधिकारावर हा घाला असल्याची चर्चा सर्वत्र ऐाकयला मिळत आहे. घुग्गुस काँग्रेसचे शहर अध्यक्ष राजुरेड्डी व पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना पत्र लिहून भाजप पदाधिकाऱ्यांवर कार्यवाही करावी असी मागणी केली आहे. मागील अडीच वर्षापासून नगरपरिषदेच्या निवडणुकांना मुहूर्त मिळालेला नाही. त्यामुळे सर्व कारभार प्रशासकांच्या हाती आहे. घुग्घूस शहरातील कारभारही नगरपरिषदेचे प्रशासक व प्रभारी मुख्याधिकारीच सांभाळत आहे. प्रशासक असताना भूमिपूजन, लोकार्पण अधिकाऱ्यांचा अधिकार असताना त्यांच्या अधिकारावर भाजप घाला घालत आहे. घुग्घूस मध्ये भाजप नेत्यांनी आटोपलेला विकासकामांचा भूमिपूजन लोर्काणाचा प्रकार गैरकायदेशीर आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, यांना पत्र लिहून तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp leaders have done bhumi puja of government work secretly rsj 74 ysh
Show comments