लोकसत्ता प्रतिनिधी
नागपूर : शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी गडकरींना पराभूत करण्यासाठी भाजपच्याच वरिष्ठ नेत्यांनी विरोधकांना रसद पुरवली, अशी टीका केल्याने भाजपचे स्थानिक नेते संतप्त झाले आहेत. त्यांनी अत्यंत खालच्या स्तरावर राऊत यांच्यावर टीका केली आहे.
संजय राऊत यांचा मेंदू सडका (भंगार) आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत स्वत:च्या वर्तमानपत्रात उलटसुलट लिखाण करून ते स्वत:चे महत्त्व वाढवत आहेत. गडकरी, फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजप कार्यकर्त्यांनी रात्रंदिवस मेहनत करून लोकसभा निवडणूक लढवली, अशी प्रतिक्रिया भाजप आमदार कृष्णा खोपडे यांनी व्यक्त केली.
हेही वाचा >>>एमपीएससी परीक्षेच्या पद्धतीत २०२५ पासून बदल; उमेदवारांना वर्णनात्मक स्वरूपातील परीक्षेची तयारी आवश्यक
खासदार संजय राऊत यांनी केलेल्या आरोपानंतर गडकरींविरोधात निवडणूक लढणारे काँग्रेस उमेदवार विकास ठाकरे यांनी मला कोणी रसद पुरवू शकत नाही, असे खडेबोल राऊत यांना सुनावले. त्यांच्याविरुद्ध पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करणार असल्याचे व न्यायालयात जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. राऊत यांनी केलेल्या आरोपांबाबत पुरावे द्यावेत, पुराव्याशिवाय काहीही बोलू नये, असे ठाकरे म्हणाले.