बुलढाणा : शिंदे गट बुलढाणा लोकसभा मतदारसंघावर कितीही हक्क सांगत असला तरी भाजपाचे मिशन-४५ कायम आहे. बुलढाणा मतदारसंघाची मुख्य जबाबदारी असलेले केंद्रीय मंत्री भुपेंद्र यादव हे आजपासून दोन दिवस पुन्हा जिल्ह्यात येत आहे. यावेळच्या दौऱ्यात त्यांनी बैठका, जनसंवाद यावर जोर दिला असून, भारत जोडो दरम्यान राहुल गांधी यांनी मुक्काम केलेल्या निमखेडी येथेही ते भेट देणार आहे.
या महत्वकांक्षी मोहिमेअंतर्गत यादव यांचा हा तिसरा दौरा आहे. यामुळे याबद्दल भाजपा व पंतप्रधान मोदी यांचे विश्वासू यादव किती गंभीर आहे हे स्पष्ट होते. आघाडी व युतीतही ‘मोठा भाऊ’ वरून वादंग निर्माण झाले असताना या दौऱ्यामुळे शिंदे गट अस्वस्थ झाला आहे. भाजपा कार्यकर्त्यांचा संवाद संमेलन जनसभेसाठी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव येत असल्याचे पक्षातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
हेही वाचा – ताडोबातील नियमबाह्य ‘रिसॉर्ट’वर कारवाई होणार, उपविभागीय अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात समिती
सकाळी यादव खासदार प्रतापराव जाधव यांचा गड असलेल्या मेहकरात दाखल होणार आहे. त्यानंतर देऊळगाव राजात त्यांचा जेष्ठ कार्यकर्त्यांसोबत संवाद, तर दुपारी अडीच वाजता प्रबुद्ध संमेलन चिखली येथे ते प्रबुद्ध संमेलनात मार्गदर्शन करणार आहे. याला जोडूनच व्यापारी संमेलन लावण्यात आले आहे. यानंतर ते बुलढाणा येथे दाखल होणार असून बुलढाणा येथे आगमन झाल्यावर ते जनसभेला संबोधित करणार आहे. आज ९ ला ते शेगावी मुक्कामी राहणार असून, उद्या १० जून रोजी सकाळी शेगाव येथे लाभार्थी संमेलन, वरवट बकाल येथे संयुक्त मोर्चा बैठकमध्ये ते मार्गदर्शन व चर्चा करतील.
निमखेडी पुन्हा चर्चेत
उद्या दुपारी बारा वाजता निमखेडी येथे ते भेट देतील. भारत जोडोअंतर्गत काँग्रेस नेते राहुल गांधी येथे मुक्कामी राहिले होते. येथून गुजरात विधानसभा निवडणुकीत प्रचार सभा घेतल्यावर ते निमखेडी येथून मध्य प्रदेशकडे रवाना झाले होते. यामुळे हे आदिवासी बहुल गाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. दुपारी भाजपा आमदार संजय कुटे यांच्या निवासस्थानी भेट दिल्यावर खामगाव मार्गे यादव संभाजीनगरकडे रवाना होणार आहे.