भाजपकडून विरोधकाविरुद्ध ‘ईडी’ सह अन्य यंत्रणांचा दुरुपयोग करण्यात येत आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत या गैरवापराचे प्रातिनिधिक, ताजे उदाहरण असल्याची आरोपवजा टीका काँग्रेसनेत्या आमदार यशोमती ठाकूर यांनी केली आहे. भाजप व संलग्न संघटना या अफवा फैलावणाऱ्या संस्था असल्याचा आरोपही त्यांनी केला.

हेही वाचा >>> वाशीम:राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्ष शुभदा नायक यांचा भाजपमध्ये प्रवेश

काँग्रेसनेते राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेच्या नियोजनासाठी आज गुरुवारी त्या शेगाव येथे दाखल झाल्या. यावेळी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना त्यांनी भाजपवर आगपाखड केली. केंद्रातील भाजपा सरकारकडून ‘ईडी’ सह अन्य यंत्रणांचा सर्रास दुरुपयोग करण्यात येत आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांचे प्रकरण हे याचे ताजे उदाहरण आहे. आपल्या विरुद्धच्या कारवाईचा धैर्याने मुकाबला करणारे संजय राऊत हे धमक असलेला माणूस असल्याचे त्या म्हणाल्या. खा. राऊत व युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे भारत जोडो यात्रेत सहभागी होतील, अशी शक्यता त्यांनी बोलून दाखवली.

‘राहुल गांधींचा सर्वांनीच अपमान केला’

काँग्रेस नेते राहुल गांधींचा भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदींसह सर्वांनीच कायम अपमान केला आहे. मात्र, त्याने विचलित न होता, राहुल आपले काम करीत राहिले. आताही त्यांच्या भारत जोडो पदयात्रेवर सर्वच जण आपापल्या पद्धतीने बोलत आहे. राहुल गांधी हे देश जोडण्यासाठी निघाले असल्याचं सांगून या यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचा दावा यशोमती ठाकूर यांनी केला.

Story img Loader