गडचिरोली : लोकसभेच्या निकालानंतर जिल्ह्यात राजकीय पक्षांमध्ये विधानसभेची लगबग सुरु झाली आहे. लोकसभेत भाजपाचे उमेदवार अशोक नेते यांचा काँग्रेसचे डॉ. नामदेव किरसान यांनी तब्बल १ लाख ४१ हजार ६९६ मतांनी दारुण पराभव केला. सहाही विधानसभेत काँग्रेसला मोठे मताधिक्य मिळाले. यामुळे भाजपच्या गोटात अस्वस्थता असून काही नेते काँग्रेसच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे विधनासभा निवडणुकीत वेगळे समीकरण दिसू शकतात.

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीला मोठे मताधिक्य मिळाले. यात विदर्भातील गडचिरोली-चिमूर क्षेत्राचा देखील समावेश आहे. दोन वेळा खासदार राहिलेले भाजपचे अशोक नेते यांचा काँग्रेसच्या नामदेव किरसान यांनी मोठ्या फरकाने पराभव केला. या विजयामुळे जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला नवसंजीवनी मिळाल्याचे बोलल्या जात आहे. तर गडचिरोलीतील तीनही विधानसभेत पिछाडीवर राहिल्याने मोदी लाटेवर स्वार भाजप नेत्यांवर आत्मचिंतनाची वेळ आली आहे. येणाऱ्या चार महिन्यात राजकीय पक्षांना विधानसभा निवडणुकीला सामोरे जायचे आहे. त्यामुळे उमेदवारांची चाचपणी सुरु झाली आहे. वर्तमान स्थितीत आरमोरी, गडचिरोली विधानसभा भाजपच्या ताब्यात आहेत. या क्षेत्रात काँग्रेसला अनुक्रमे ३३ हजार ४२१ आणि २२ हजार ९९७ इतक्या मतांची आघाडी आहे. तर अहेरी विधासनभा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यात आहे. याठिकाणी सुद्धा काँग्रेसला १२ हजार १५२ इतके मताधिक्य आहे. मधल्या काळात बदलेल्या समीकरणामुळे महायुतीत अजित पवार गटाची भर पडली आहे. तर महाविकासआघाडीत देखील तीन पक्ष आहेत. त्यामुळे जागावाटपात सर्वच पक्षांची कसोटी लागणार आहे. मतदारसंघात मताधिक्य विरोधात गेल्याने अस्वस्थ झालेले जिल्ह्यातील भाजपचे दोन नेते काँग्रेसच्या संपर्कात असून निवडणुकीसमोर भाजपला खिंडार पडण्याची चिन्हे आहेत. तर काँग्रेसला आलेले ‘अच्छे दिन’ बघून पक्षांतर्गत स्पर्धाही वाढल्याची दिसून येत आहे.

हेही वाचा >>>अमरावती : दुधात गुरांच्‍या हौदातील पाण्‍याची भेसळ! सीसीटीव्‍ही कॅमेरामुळे प्रकार उजेडात

विद्यमान आमदारांची जागा धोक्यात ?

जिल्ह्यात दोन विधानसभा भाजपाच्या ताब्यात आहे. तर एका जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व आहे. काँग्रेसला सर्वाधिक मताधिक्य मिळालेल्या आरमोरी विधानसभेत दोन वेळपासून भाजपाचे आमदार असलेले कृष्ण गजबे यांची जागा धोक्यात आली आहे. तर गडचिरोलीत डॉ. देवराव होळी यांना वेळवर पक्षाकडून ‘थांबा’ मिळू शकतो. भाजपाने या दोघांना पर्याय शोधणे सुरु केल्याचे कळते. दोन्ही जागेसाठी काँग्रेसकडूनही जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. काँग्रेसतर्फे आरमोरीत आनंदराव गेडाम, तर गडचिरोलीत विश्वजित कोवासे यांची नावे आघाडीवर आहे. तर आत्राम राजघराण्याचे वर्चस्व असलेल्या अहेरी विधानसभेत मंत्री धर्मरावबाबा आत्राम पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहेत. त्यामुळे भाजपचे अम्ब्रीशराव आत्राम यांची जागा धोक्यात आली आहे. काँग्रेसकडून यंदा सेवानिवृत्त वनाधिकारी हनमंतू मडावी यांना संधी देण्यात येणार अशी चर्चा आहे. त्यामुळे यावेळी सर्वधिक चूरस या विधानसभेत पाहायला मिळू शकते.